पुण्यातल्या डिस्काे भज्यांची चव तुम्ही चाखलीत का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 07:15 PM2018-05-10T19:15:42+5:302018-05-10T19:15:42+5:30
भज्यांचे विविध प्रकार अापण चाखले असतील परंतु पुण्यात मिळणाऱ्या डिस्काे भज्यांची चवच काही अाैरच अाहे.
पुणे : पुण्याच्या संस्कृतीत खाद्य संस्कृतीचे स्थान माेठे अाहे. पुण्यातील अनेक खाद्यपदार्थांची चव जगभर प्रसिद्ध अाहे. त्यातही पुणेकर हे त्यांच्या वेगळेपणासाठी नेहमीच अाेळखले जातात. अाजपर्यंत तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, मूग भजी अादी भज्यांचे प्रकार चाखले असतील. परंतु पुण्यात मिळणाऱ्या डिस्काे भज्यांची चव तुम्ही चाखली नसेल. पुण्यातील नारायण पेठेत अनाेखी अशी डिस्काे भजी मिळतात. ही भजी खाण्यासाठी राेजसंध्याकाळी पुणेकर गर्दी करत असतात.
नारायण पेठेतील एका काेपऱ्यावर श्री स्मामी समर्थ वडापाव सेंटर अाहे. डिस्काे भजी या सेंटरची खासियत अाहे. हे वडापाव सेंटर चालविणारे वैभव जंगम यांच्या मित्राने अक्कलकाेट येथे अशी भजी खाल्ली हाेती. तिकडे या भज्यांना कट भजी म्हंटले जात. त्यांनी याबाबतची माहिती जंगम यांना दिली. अापणही अशी भजी पुण्यात सुरु करुया असे त्यांनी ठरवले त्याला काहीतरी वेगळे नाव द्यावे या हेतून त्यांनी डिस्काे भजी असे नाव दिले अाणि पाहता पाहता ही भजी पुण्यात प्रसिद्ध झाली. पुण्यातील विविध भागातून केवळ ही डिस्काे भजी खाण्यासाठी नागरिक नारायण पेठेत येत असतात. जंगम यांच्या एका मित्राने तर थेट थायलंडला ही भजी नेली हाेती.
डिस्काे भजी ही इतर भज्यांपेक्षा थाेडी वेगळी अाहेत. हिरव्या मिर्च्या पिठात तळून त्यांना कापण्यात येते. त्यानंतर पुन्हा त्यांना तेलात पूर्ण तळून त्यावर मसाला तसेच चाट टाकला जाताे. त्यामुळे ही भजी खाण्यास उत्तम अाणि कुरकुरीत लागतात. चहा साेबत तर या भज्यांची मजाच काही अाैर असते. संध्याकाळी चार नंतर ही भजी येथे मिळतात. काहींना या भज्यांची इतकी सवय झाली अाहे, की संध्याकाळच्या वेळी चहा साेबत त्यांना ही भजी लागतातच. त्यासाठी ते भजी हाेईपर्यंत वाटही पाहत बसतात. त्यामुळे तुम्ही अद्याप या भज्यांची चव चाखली नसेल तर नक्कीच एकदा चव घेऊन बघा.