दंगलीची माहिती सरकारला मिळाली नव्हती का? : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:05 IST2024-12-19T11:05:03+5:302024-12-19T11:05:24+5:30
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोरील साक्षीनंतर साधला पत्रकारांशी संवाद

दंगलीची माहिती सरकारला मिळाली नव्हती का? : प्रकाश आंबेडकर
पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलीची प्राथमिक माहिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली होती किंवा ती मिळाली नसल्यास का मिळाली नाही याचा शोध कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने घ्यावा, अशी साक्ष वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यांच्याकडील अन्य महत्त्वाची कागदपत्रेही मागवावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोरेगाव भीमा आयोगाला मुदतवाढ मिळाल्यानंतर आंबेडकर यांची बुधवारी (दि. १८) पुन्हा साक्ष झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साक्षीमध्ये त्यांनी आयोगाला पूर्वी दिलेल्या पत्राचा उल्लेख केला. दंगलीची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मलिक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांना मिळाली होती. मात्र, ती माहिती मिळाली नसल्यास का मिळाली नाही याचा शोध घेण्याचे काम आयोगाचे आहे. त्यांनी ते करावे, असे आंबेडकर यांनी सांगितले. अशी दंगल पुन्हा घडू नये, यासाठी सरकारने सूचना मागितल्या आहेत. तसेच घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारचे धोरण कसे चुकले, याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पवार यांच्याकडे आणखी महत्त्वाची कागदपत्रे असल्यास आयोगाने ती मागून घ्यावीत, असा युक्तिवादही आयोगापुढे केला.
अमित शाहांवर टीका
राज्यघटनेच्या निर्मितीवेळी जनसंघाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध होता. आताही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे. त्यामुळे मंगळवारी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकरांविषयी केलेले वक्तव्य हे त्यांच्या जुन्या मानसिकतेचेच लक्षण आहे. वक्तव्यातून ती पुन्हा बाहेर आली आहे. त्यात नवीन काहीच नाही. त्यावेळी त्यांचे असलेले नियोजन अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्याची अंमलबजावणीही करता येत नसल्याने त्यांचा जळफळाट होत आहे, अशी खरमरीत टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.