उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे वाटले नव्हते, पण पदाचा मान ठेवतो; नारायण राणेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 12:38 PM2020-01-26T12:38:42+5:302020-01-26T12:40:14+5:30
नारायण मनाची श्रीमंत ठेवावी, म्यानात एकच तलवार राहू शकते, असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते.
पुणे : शिवसेनेमध्ये मी 39 वर्षे होतो. याकाळात बाळासाहेबांच्या जवळ आलो. साहेब म्हणायचे की, नारायण मनाची श्रीमंत ठेवावी, म्यानात एकच तलवार राहू शकते. माझे गुरु बाळासाहेब ठाकरेच आहेत, असे उद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली.
पुण्यातील सॅटर्डे क्लबमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार गिरीश बापट, मोहन जोशी, घटनातज्ज्ञ उल्हास बापट, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे यांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. एका म्यानात दोन तलवारी कोणत्या याबाबत सांगताना राणे म्हणाले की, पैसा आणि नावलौकिक असे बाळासाहेबांनी सांगितले होते.
यानंतर राणे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तुतीसुमने उधळली. फडणवीस यांना मी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी पाहिले. ते अभ्यासू व्यक्ती, सहनशील व्यक्ती, कोणावर रागवले नाहीत. कधी उत्तर दिले नाही, असं नाही पण त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा घालून दिलेला आदर्श त्याला साजेस काम केले आणि पत सावरली. आता उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मान सन्मान ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर त्यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. व्यक्ती म्हणून मला कधीही वाटले नव्हते की उद्धव मुख्यमंत्री होतील. मात्र, पदाचा मान ठेवावा लागतो. उद्धव अनुभव शून्य व्यक्ती असल्याने राज्य अधोगतीकडे जाईल, असा इशाराच त्यांनी दिला.
तसेच यानंतर त्यांनी नाईट लाईफवर भाष्य केले. नाईच लाईफची मागणी कोणाचीच नसताना तो केवळ चिरंजीवाचा हट्ट आहे. हा बालहट्ट पुरविण्याऐवजी इतर प्रश्न सोडविण्यात लक्ष घालावे, असा सल्ला राणे यांनी दिला.