डिझेल दरवाढीचा अन् समांतर वाहतुकीचा एसटीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:56+5:302021-07-03T04:08:56+5:30
पुणे : डिझेल दरवाढीचा अन् समांतर वाहतुकीचा एसटीला आर्थिक फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाला रोजचा जवळपास १४ कोटींचा ...
पुणे : डिझेल दरवाढीचा अन् समांतर वाहतुकीचा एसटीला आर्थिक फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाला रोजचा जवळपास १४ कोटींचा फटका बसत आहे. त्यामुळे एसटीला दररोज लागणारे डिझेल पूर्ण क्षमतेने खरेदी करू शकत नाही. परिणामी काही गाड्या रद्द कराव्या लागत आहे. यातच विविध डेपोच्या गाड्या एकाच मार्गावर धावत असल्याने समांतर वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रवासाची विभागणी होत आहे. काही गाड्यांवर ४ ते ५ प्रवासी घेऊन वाहतूक सुरू आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सध्या १० हजार गाड्या धावत आहे. यातून कसेबसे ८ कोटी रुपयांचे दररोजचे उत्पन्न मिळत आहे. प्रवासीसंख्या कमी असल्याने एसटीचे उत्पन्न कमी होत आहे. यातच सतत वाढत जाणारे डिझेलचे दर, कमी उत्पन्न त्यामुळे एसटी प्रशासन कमी प्रमाणात डिझेलची खरेदी करीत आहे. डिझेलअभावी महत्त्वाचे मार्ग वगळता कमी प्रतिसाद असलेल्या मार्गावर वाहतूक बंद आहे.
-------------------
डिझेलअभावी काही वेळा गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मात्र असे फार कमी वेळा घडले आहे. पुणे विभागात समांतर वाहतूकची समस्या नाही.
ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे.
-------------------------
प्रवासीसंख्या कमी असल्याने एसटीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातच राज्यात अनेक विभागांत समांतर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे एसटीची स्पर्धा एसटीशी असे चित्र निर्माण होत आहे. हे तत्काळ थांबले पाहिजे. वाहतूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.
-श्रीरंग बर्गे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस