डिझेल दरवाढीचा पीएमपीला भुर्दंड, महिनाभरात सव्वा सहा रुपये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 01:42 AM2018-10-02T01:42:14+5:302018-10-02T01:42:33+5:30
महिनाभरात सव्वा सहा रुपये वाढ : दैनंदिन खर्चात अडीच लाखांची भर
पुणे : दररोजचा खर्च भागवता भागवता नाकीनऊ येत असताना, पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) डिझेल दरवाढीने जेरीस आणले आहे. मागील महिनाभरात डिझेलच्या दरात सव्वा सहा रुपयांची वाढ झाल्याने इंधनाचा दैनंदिन खर्च अडीच लाख रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे पीएमपीला खर्च भागवताना मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती आहे. दररोज वाढणारे इंधन दर आता पीएमपीला परवडणारे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ८०० बस डिझेलवर चालणाºया आहेत, तर जवळपास ६०० बस सीएनजीवर धावतात. आॅगस्ट महिन्यानंतर सीएनजीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, डिझेल दरवाढीचा फटका पीएमपीला बसत आहे. डिझेलवरील बसला दररोज सुमारे ४० हजार लिटरची गरज असते. पीएमपीला काहीशा कमी दराने इंधन कंपनीकडून डिझेलचा पुरवठा होतो. सोमवारी (दि. १) हा दर प्रति लिटर ७५ रुपये होता. या दरानुसार पीएमपीचा डिझेलवरील दैनंदिन खर्च ३० लाखांवर गेला आहे. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पीएमपीला ६८.७५ रुपये प्रतिलिटर दराने डिझेल उपलब्ध होत होते. महिनाभरात सव्वा सहा रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर अखेरपर्यंत दैनंदिन खर्चात अडीच लाख रुपयांची भर पडली आहे.
इंधन कंपनीकडून पीएमपीसाठी दर पंधरा दिवसांनी दर निश्चित केले जातात. त्यानुसार ३१ आॅगस्टला ६८.७५ रुपये हा दर होता. त्यामध्ये दि. १ सप्टेंबर रोजी १ रुपये ६० पैशाने तर १६ सप्टेंबरला ३ रुपये ४५ पैसे आणि १ आॅक्टोबरला १ रुपये १९ पैशाने वाढ करण्यात आली. एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल दरात वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तसेच आतापर्यंत पीएमपीने एवढ्या महागाईचे इंधन कधीही खरेदी केलेले नव्हते. सीएनजीच्या दरातही आॅगस्ट महिन्यात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. पीएमपीला सध्या प्रतिकिलो ५० रुपयांनी सीएनजीचा पुरवठा होता. त्यासाठी दररोज २० लाख रुपये मोजावे लागत आहेत. केवळ इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे इंधनावरील हा खर्च पीएमपीचे कंबरडे मोडणारा ठरत आहे.
मागील महिनाभरातील डिझेल दरातील वाढ
दि. १ सप्टेंबर - १ रुपये ६० पैसे
दि. १६ सप्टेंबर - ३ रुपये ४५ पैसे
दि. १ आॅक्टोबर - १ रुपये १९ पैसे
इंधनावरील दैनंदिन खर्च (अंदाजे)
बस इंधन गरज खर्च
डिझेल ८०० ४० हजार लिटर ३० लाख रुपये
सीएनजी ६०० ३८ ते ४० हजार किलो २० लाख रुपये