Pune: आळेफाटा परिसरात डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; चोरीचे डिझेल ठेवण्यासाठी भाड्याची खोली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:24 PM2024-04-15T17:24:43+5:302024-04-15T17:25:11+5:30
गेल्या काही महिन्यांपासून पुणे-नाशिक महामार्गावर ही टोळी मालट्रक मथून डिझेल चोरी करत होती...
आळेफाटा (पुणे) : रात्रीच्या वेळी हायवेच्या कडेला, ढाब्यांवर, लावलेल्या मालट्रक मधून डिझेल चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींकडून २ कार, व भाड्याच्या खोलीमध्ये ठेवलेले ५७५ लिटर डिझेल असा १७ लाख ५२ हजार ४११ रूपयांचा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे.
चार गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे-नाशिक महामार्गावर ही टोळी मालट्रक मथून डिझेल चोरी करत होती. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेली माहिती अशी की, आळेफाटा पोलिस स्टेशन हद्दीत ८ एप्रिल रोजी रूपेश ज्ञानेश्वर वाळुंज यांच्या हायवा मधून अज्ञात चोरट्याने डिझेल टाकीचे झाकण तोडून त्याद्वारे टाकीमध्ये असणारे ६० लिटर डिझेल तसेच योगेश पाडेकर व सुदर्शन जाधव यांचे सुद्धा बायपास ब्रिजचे जवळ लावलेल्या गाड्यांमधून डिझेल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दाखल गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की कुणाल बोंबले, ओमकार देवकर, राहुल हिंगे (सर्व रा. राजगुरूनगर ता. खेड) हे असे डिझेल चोरीचे गुन्हे करीत असून त्यांनीच सदरचा गुन्हा केला असावा. राजगुरूनगर येथे जाऊन सदरचे संशयित इसमांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा येथे डिझेल संदर्भाने गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा पोलिस स्टेशनचे हद्दीत डिझेल चोरल्याचे कबूल केले. त्यांच्यावर मंचर व पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चोरलेले डिझेल हे भाड्याने घेतलेल्या वाकळवाडी (ता. खेड जि. पुणे) येथील खोलीमधून चोरीस गेलेल्या एकूण डिझेल पैकी ५७५ लिटर डिझेल जप्त केले . गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा व इर्टिका कार जप्त करण्यात आली आहे. त्यांचेकडून एकूण ४ गुन्हे उघडकीस आले असून एकूण १७,५२,४११ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.