अंतिम मतदारयाद्यांत फरक
By admin | Published: February 16, 2017 03:35 AM2017-02-16T03:35:07+5:302017-02-16T03:35:07+5:30
महापालिका निवडणुकीची आयोगाने जाहीर केलेले अंतिम मतदारयादी व त्यानंतर निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेली केंद्रनिहाय यादी
पुणे : महापालिका निवडणुकीची आयोगाने जाहीर केलेले अंतिम मतदारयादी व त्यानंतर निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेली केंद्रनिहाय यादी यामध्ये मतदारांच्या अनुक्रमांकात फरक असल्याची तक्रार राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. आयोगाच्या वतीने मात्र या तक्रारीत तथ्य नसून यादी बरोबरच असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदारयादीचा आधार घेण्यात आला आहे. त्यातील नावांची दुरूस्ती व अन्य कारणांसाठी मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार दुरूस्त्या करण्यात आल्या. दरम्यानच्या काळात प्रभाग रचना नव्याने जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रभागनिहाय यादी जाहीर करण्यात आली.
त्यातही दुरूस्त्या करून प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी जाहीर झाली. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी अर्जामध्ये त्यांचा
मतदारयादीतील अनुक्रमांक म्हणून
या अंतिम मतदार यादीमधील
क्रमांक दिला आहे. प्रभागातील मतदान केंद्रनिहाय यादी त्यानंतर जाहीर करण्यात आली. ती जाहीर करताना मतदारांच्या अनुक्रमांकात बदल झाले असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव महेश महाले यांनी वतीने सांगितले, की केंद्रनिहाय यादी जाहीर करताना त्यात केंद्र क्रमांक १ मतदार अनुक्रमांक १ ते ८००, केंद्र क्रमांक २, मतदार अनुक्रमांक ८०१ ते पुढे असे आहे. प्रत्यक्षात केंद्रनिहाय यादी म्हणून जी यादी देण्यात आली आहे, त्यात मात्र केंद्र क्रमांक १ मतदार अनुक्रमांक १ ते ८००, केंद्र क्रमांक २ मतदार अनुक्रमांक पुन्हा १ ते ८०० असे देण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडणार असल्याचे महाले यांचे म्हणणे आहे. अन्य काही राजकीय पक्षांचीही याचप्रमाणे तक्रार आहे. (प्रतिनिधी)