मृतांच्या आकड्यात तफावत, खारगाव दुर्घटनेची चाैकशी व्हावी- अजित पवार
By श्रीकिशन काळे | Published: April 21, 2023 02:44 PM2023-04-21T14:44:45+5:302023-04-21T14:45:43+5:30
या प्रकरणाविषयी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी सांगितले...
पुणे : खारगाव येथे झालेली दुर्घटनेची वस्तूस्थिती समोर यायला हवी. तेथील आकड्यात तफावत आहे. त्यामुळे आम्ही माहिती अधिकाराखाली त्या दुर्घटनेची माहिती मागविली आहे. त्यामध्ये स्पष्ट होईल. तसेच आतापर्यंत दिल्या गेलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचा सर्वाधिक खर्च या वेळी झाला, या प्रकरणाविषयी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, खारगाव येथील घटनेची क्लिप पाहिली तर त्यात भयानक स्थिती दिसली. काही फोटोत एकीकडे चांदीचे ताटात जेवण सुरू आहे आणि दुसरीकडे लोकं गतप्राण होत आहेत, हा विरोधाभास आहे. यात नक्की कितीजण गेले त्याचा तपास व्हायला हवा. सरकारने कार्यक्रम आयोजित केला होता.
सरकारची जबाबदारी होती. सरकार सांगते या म्हणून माणसं तिथे गेली. खरंतर दुपारची वेळ का निवडली. लोकांना वेळेवर सोयी का दिल्या नाहीत. मी असं ऐकलंय की, पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये असं आढळून आले की, त्या लोकांच्या पोटात ८ तास अन्नपाणी गेले नव्हते. हे सर्व गंभीर आहे. न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे.’’