‘कमवा-शिका’तून जगणे कठीण

By Admin | Published: March 29, 2016 03:42 AM2016-03-29T03:42:41+5:302016-03-29T03:42:41+5:30

विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात राज्यभरातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. मात्र, दुष्काळाच्या परिस्थितीमुळे गावाकडे जाण्यापेक्षा

Difficult to live with 'earn-learn' | ‘कमवा-शिका’तून जगणे कठीण

‘कमवा-शिका’तून जगणे कठीण

googlenewsNext

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात राज्यभरातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. मात्र, दुष्काळाच्या परिस्थितीमुळे गावाकडे जाण्यापेक्षा पुण्यातच राहिलेले बरे, असा विचार विद्यार्थी करीत आहेत. घरच्यांकडून मिळणारी आर्थिक मदतही बंद झाली आहे. केवळ विद्यापीठाच्या ‘कमवा व शिका’ योजनेतून मिळणाऱ्या मानधनावर राहण्याचा व खाण्याचा खर्च भागवता-भागवता नाकीनऊ येत असल्याचे विद्यार्थांशी बोलताना समोर आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांत आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यलयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज ३ ते ४ तास विविध प्रकारची कामे दिली जातात. या कामाचा मोबदला म्हणून विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला ३० रुपये मिळतात. विद्यार्थ्यांनी महिनाभर दररोज ३ तास काम केल्यानंतर २,७०० रुपये मानधन मिळते. मात्र, पुण्यासारख्या शहरात भाड्याने खोली घेऊन खासगी खानावळीतील जेवणाचा आणि महाविद्यालयात व विद्यापीठ पोहोचण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठाने ‘कमवा व शिका’ योजनेच्या मानधनात वाढ करावी किंवा कामाचे तास वाढवून द्यावेत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठाकडे कोट्यवधीचा निधी पडून राहतो. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कमीत कमी दरात जेवण व चहानाश्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. त्याचबरोबर कमवा व शिका योजनेसाठी केवळ विद्यापीठानेच नाही, तर राज्य शासनाने व विविध कंपन्यांनी सीएसआरअंतर्गत मदत करायला हवी. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या भीषण स्थितीमुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ येणार नाही, याची काळजी शासनाचीच नाही तर समाजाचीदेखील आहे.

कसा भागविणार खर्च ?
विद्यापीठात किंवा महाविद्यालयात वसतिगृह मिळाले नाही, तर विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहावे लागते. बऱ्याच वेळा चार ते पाच विद्यार्थी एकत्र येऊन खोली भाड्याने घेतात. त्यासाठी प्रत्येकाला दरमहा साधारणपणे दोन हजार रुपये खर्च येतो. विद्यापीठात खानावळीचा ३५ रुपये या दराने दोन वेळच्या जेवणासाठी डबा लावला, तर महिन्याला २ हजार १०० रुपये खर्च येतो. दररोज सकाळी व सायंकाळी चहा आणि नाश्त्यासाठी ३५ रुपये खर्च होतो. दैनंदिन गरजा भागविण्याबरोबरच अभ्यासासाठी लागणारी पुस्तके घ्यावी लागतात. त्यामुळे केवळ ‘कमवा व शिका’ योजनेवर जगणे अवघड झाले आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हाल
विद्यापीठातील कमवा व शिका योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दर महिन्याचे मानधन विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात जमा केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक चणचण भासत नाही; परंतु विद्यापीठाकडून महाविद्यालयांना निधी देऊनही महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे मानधन वेळेत दिले जात नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
केलेल्या कामाचा मोबदला महाविद्यालय प्रशासनाकडून वेळेत मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो. परंतु, त्यांना दाद मिळत नाही. विद्यापीठाकडे याबाबत तक्रार केल्यास महाविद्यालयाकडून त्रास दिला जाईल, या भीतीने अनेक विद्यार्थी गप्प बसतात. महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे तीन महिन्यांनंतर मानधन दिले जाते.

वसतिगृहही
सुरू ठेवावे, विद्यार्थ्यांची मागणी
विद्यापीठाने सुटीच्या कालावधीत ‘कमवा व शिका’ योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. मागील वर्षीसुद्धा विद्यार्थ्यांनी या योजनाचा लाभ घेतला. मात्र, केवळ योजना सुरू ठेवून उपयोग नाही, तर वसतिगृहही सुरू ठेवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

कमवा व शिका योजनेच्या रकमेत वाढ करण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेला आहेत. विद्यार्थ्यांची एकूण परिस्थिती विचारात घेऊन येत्या व्यवस्थापन परिषदेत याबाबत चर्चा केली जाईल.
- डॉ. वासुदेव गाडे कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मी भंडारदरा येथील असून विद्यापीठात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. गावाकडे दुष्काळ असल्याने सुटीच्या कालावधीतही मी पुण्यातच राहणार आहे. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठाने सुटीतही वसतिगृह सुरू ठेवावे. कमवा व शिका योजनेतून मिळणाऱ्या रकमेतून केवळ जेवण आणि नाश्त्याचा खर्च निघतो. मानधन वाढविण्याबाबत निर्णय घ्यावा.
- भूपेंद्र जांभूळकर, विद्यार्थी,
मराठी विभाग, पुणे विद्यापीठ

‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत पूर्ण महिना काम केल्यानंतर साधारण २,७०० रुपये हातात पडतात. वसतिगृहातच राहण्यास असल्याने सुमारे १,५०० रुपये जेवणाचा खर्च होते. चहा-नाश्त्यासाठी वेगळा खर्च होतो. मात्र, दुष्काळामुळे वसतिगृहामध्ये राहण्याची सोय व्हायला हवी, नेट परीक्षेसाठीही अर्ज भरल्याने वसतिगृहात राहण्याची सोय झाली पाहिजे.
- सारिका पेरणे, विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या मुला-मुलींचे हाल होतात. पुण्यासारख्या ठिकाणी, भाड्याची रूम घेऊन जेवणाचे पैसे सुटू शकत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने मानधनात वाढ करणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये वसतिगृहाची सोय होणे गरजेचे आहे.
- नीलोफर सय्यद, विद्यार्थी, वाणिज्य विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मी नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील असून परीक्षा संपल्या तरीही दुष्काळामुळे पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेअंतर्गत मी काम करतो. जेवण व नाश्त्याचा खर्च भागतो. मात्र, अभ्यासासाठी पुस्तकांवर खर्च करण्यासाठी पैसे उरत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने सहानुभूतिपूर्वक विचार करावा, तसेच वसतिगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- तुषार जाधव, इतिहास विभाग

Web Title: Difficult to live with 'earn-learn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.