घरकाम करणाऱ्या महिलांना लस मिळण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:53+5:302021-07-17T04:08:53+5:30
पुणे : ‘आजपर्यंत मी पाच-सहा वेळा लसीकरण केंद्रावर जाऊन आले. एकदा लसीच आल्या नसल्याचे सांगण्यात आले, एकदा कोविन अॅपवर ...
पुणे : ‘आजपर्यंत मी पाच-सहा वेळा लसीकरण केंद्रावर जाऊन आले. एकदा लसीच आल्या नसल्याचे सांगण्यात आले, एकदा कोविन अॅपवर नोंदणी करुन या, असे कारण देण्यात आले. तीन-चारदा कामांवरून सुट्टी घेऊन सकाळी १० वाजता लसीकरण केंद्रांवर पोहोचले असता दुपारी २ वाजेपर्यंत सर्व लसी संपल्या. खाजगी रुग्णालयात लस घेणे परवडणारे नाही’....ही प्रतिक्रिया आहे वाघोली परिसरात घरकाम करणाऱ्या कमला सोनवणे यांची... ही झाली प्रातिनिधिक प्रतिक्रिया. शहरातील अनेक घरेलू कामगार महिलांना लस मिळण्यात अडचणी येत आहेत.
पुणे शहरात १० हजारहून अधिक घरकाम करणाऱ्या महिला आहेत. शहरात ३८० हून अधिक लसीकरण केंद्रे असली तरी बहुतांश दिवशी निम्म्याच लसीकरण केंद्रांवर लसी उपलब्ध असल्याने अडचणी येत आहेत. स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, किंवा त्या ज्या घरी काम करतात, त्या लोकांनी महिलांना लसीकरणासाठी सहकार्य करावे, असा सूर व्यक्त होत आहे.
कोरोनाची साथ रोखण्यासाठी लसीकरण प्रक्रिया जलद गतीने राबवण्यावर भर दिला जात आहे. मात्र, घरकाम करणाऱ्या अनेक महिला लसीच्या पहिल्या डोसपासून अजूनही वंचित आहेत. या महिला अनेक घरांमध्ये काम करतात, अनेक लोकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे त्यांचे लसीकरण प्राधान्याने होणे आवश्यक असताना, कोविन अॅपबाबत माहिती नसणे, लसीकरण केंद्रांवर गेल्यावर लसच न मिळणे अशा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे.
एक महिला साधारणपणे चार-पाच घरांमध्ये धुणे, भांडी, स्वच्छता अशी कामे करते. कामाच्या निमित्ताने ती दररोज लोकांच्या संपर्कात येत असते. कोरोनाची दुसरी लाट कमी झालेली असली तरी शहरात दररोज २५०-३५० कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणेरहित कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास तिला आणि तिच्या घरच्यांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असंघटित कामगार, घरेलू कामगार महिला यांच्या लसीकरणासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात यावी, त्यांना वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण व्हावे, अशी मागणी होत आहे.
--------------------
लसीकरण केंद्रे -
पुणे ग्रामीण - ४१७
पुणे मनपा - ३८८
पिंपरी चिंचवड - ९३
घरेलू कामगार महिलांची संख्या - १०,०००
-------------------
मी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गेले होते. तेथे कोविन अॅपवर नोंदणी करावी, असे सांगण्यात आले. वेबसाईटवर सकाळी ८ वाजता स्लॉट सुरू होतात आणि लगेच संपतात, अशीही माहिती मिळाली. माझ्याकडे स्मार्ट फोन नसल्याने मला नोंदणी करता येत नाही. त्यामुळे शेवटी खाजगी रुग्णालयात जावे लागले.
- त्रिशला साळुंखे, घरकाम करणारी महिला
-------------
दररोजच्या बातम्यांमध्ये काही केंद्रांवरच लस उपलब्ध असल्याचे वाचायला मिळते. महिला लसीकरण केंद्रांवर गेल्या तर लसी आलेल्या नसतात किंवा संपलेल्या असतात. रिक्षाला, बसला त्यांचे पैसे खर्च होतात. महापालिकेकडून वस्त्यांमध्ये अथवा काही केंद्रांमध्ये घरेलू कामगार महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी लसींचा कायमस्वरुपी पुरवठा होणे आवश्यक आहे. काही कामगार महिलांना त्या जिथे कामाला जातात, तिथल्या लोकांनी पुढाकार घेऊन लस घेऊन दिली आहे. सध्या संघटनेच्या ५००० सदस्य आहेत.
- मेधा थत्ते, अध्यक्ष, घरेलू कामगार संघटना
--------------
माझ्याकडे कामाला येणाऱ्या ताईंनाही अनेकदा प्रयत्न करून महापालिका केंद्रांवर लस मिळाली नाही. त्या सलग तीन-चार दिवस सकाळी सहा वाजल्यापासून जाऊन बसत होत्या. मात्र, लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. आमच्या कुटुंबाने खासगी रुग्णालयात लस घेतली, तेव्हा आम्ही ताईंनाही लसीकरणासाठी सोबत घेऊन गेलो.
- विशाखा जोशी, गृहिणी