दिघीकरांचे आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:33 AM2018-08-25T01:33:41+5:302018-08-25T01:34:11+5:30
साथीचे रोग पसरविण्यास कारणीभूत ठरत असलेल्या क्युलेक्स, एडिस इजिप्त, डेंगी अळीच्या वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाने दिघी परिसरात डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाल्याने दवाखाने हाऊसफुल
दिघी : साथीचे रोग पसरविण्यास कारणीभूत ठरत असलेल्या क्युलेक्स, एडिस इजिप्त, डेंगी अळीच्या वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाने दिघी परिसरात डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाल्याने दवाखाने हाऊसफुल झाल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत जमा होणारे वर्षानुवर्षाचे गटारीचे पाणी यामुळे परिसर दुर्गंधीयुक्त होऊन दिघीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दिघीतील साई पार्कमधील गणेश कॉलनी क्रमांक दोनमधील लष्करी सीमाभिंतीच्या मागे गटारीचे पाणी साठले आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. थोडेदिवस काम करून अर्धवट स्थितीत काम बंद पडल्याने आरोग्यविषयक समस्येत वाढ झाली आहे. अशीच परिस्थिती स्मशानभूमीजवळ वायरलेस हद्दीतील तळ्याच्या आजूबाजूच्या परिसराची झाली आहे. हवेच्या बदलत्या दिशेमुळे उग्रवास दूरवर पसरत आहे. यामुळे लहान मुलांना श्वसनाच्या तक्रारी व उलट्यांचा त्रास होत आहे. संध्याकाळी व सकाळी डासांच्या थैमानाने घरात बसणे कठीण झाले आहे. गावठाण, साई पार्क, आदर्शनगर, अशा सर्व भागांतील गटारीचे पाणी या तळ्यात जमा होत आहे. दिवसेंदिवस घाण पाणी जमा झाल्याने अनेक साथीच्या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती जोमाने वाढत आहे. प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याने समस्या वाढीस लागली आहे. गावठाणातील पालिकेच्या शाळेजवळील मोकळ्या लष्करी भागातील जागेत गायकवाडनगर, चौधरी पार्क, दिघी गावठाण, डोळसवस्तीतील गटारीचे पाणी जमा झाले आहे. जमा झालेल्या पाण्यावर शेवाळ तयार होऊन पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. पाण्याला उग्रवास येत असून परिसरातील कचरा येथे टाकल्याने डासांची संख्या वाढली आहे.
खड्ड्यांमध्ये साचले पाणी
१साथीच्या रोगांना कारणीभूत ठरणाºया डासांची उत्पत्ती वाढत असल्याने लहान मुलांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. परिसरातील अनेक भागांत वाढलेल्या या डासांच्या प्रादुर्भावाने डेंगी, मलेरिया, हगवण, ताप यासारखे साथीचे आजार जोर धरण्यास पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. आरोग्य प्रशासनाकडूनही याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. जंतूनाशक धुरफवारणी, तुंबलेल्या गटारी, खड्ड्यांमध्ये पावसाचे जमा झालेले पाणी, निर्जंतुक करावी लागणार आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता
२ रोगांना पोषक ठरत असलेल्या वातावरणातील झालेल्या बदलाने दिघीतील साई पार्कमधील नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. डेंगी सारख्या आजाराने परिसरातील नागरिक शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. शरीरातील पांढºया पेशी कमी होऊन लहान मुले तापाने फणफणली आहेत. आरोग्य प्रशासनाच्या कर्मचाºयांची अपुरी संख्या व नागरिकांमधून वाढलेली मागणी या विरोधाभासाने दिघी परिसरात रोगराईस वाव मिळत आहे.