प्रचारासाठी डिजिटल रथाला प्राधान्य]
By admin | Published: February 18, 2017 03:58 AM2017-02-18T03:58:17+5:302017-02-18T03:58:17+5:30
कमी कालावधीमुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड असल्याने बहुसंख्य माननीयांनी आपण केलेल्या कामाची माहिती सर्वांपर्यंत
पुणे : कमी कालावधीमुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड असल्याने बहुसंख्य माननीयांनी आपण केलेल्या कामाची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल रथाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे़
प्रत्येक प्रभागातील चारही उमेदवार एकत्रितपणे पदयात्रा करून मतदारांशी संपर्क साधत आहेत़ एकत्रित प्रचार केल्याने जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्यास त्यांना मर्यादा येऊ लागल्या आहेत़
त्यामुळे अपक्षांसह सर्वच उमेदवारांनी रिक्षांद्वारे प्रचार करण्यास सुरुवात केली आहे़ त्याचबरोबर नगरसेवकांनी आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल रथाचा आधार घेतला आहे़ छोट्या टेम्पोच्या एका बाजूला मोठा स्क्रीन लावला जातो़ त्यावर त्या उमेदवाराची तयार केलेली फिल्म दाखविली जात आहे़
चौकाचौकांत, गल्लीतील एका कोपऱ्यात हा टेम्पो उभा केला जातो़ टेम्पो चालकाला ही फिल्म कशी सुरू करायची, याची माहिती दिलेली असते़ टेम्पो थांबवून तो ही फिल्म सुरू करतो़
अनेक नगरसेवकांनी आपली स्वत:ची फिल्म केली असली तरी चारचा प्रभाग असल्याने प्रभागातील पक्षाच्या इतर तीन उमेदवारांनाही त्यात स्थान दिलेले दिसते़ काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रामुख्याने सोनिया गांधी, राजीव गांधी, राहुल गांधींच्या छायाचित्रांबरोबरच काँग्रेस सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली आहे़ त्याबरोबरच प्रत्येकाने आपण कोणकोणती कामे पुणे शहरात केली़ काँग्रेसने शहरात केलेली कामे यांची माहिती दिली आहे़
भाजपाच्या उमेदवारांचा सर्व भर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिसून आला आहे़ अनेकांच्या फिल्मची सुरुवातच नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होताना दिसत आहे़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा भर हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दिसून आला़ राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत केलेल्या विविध कामांचे व्हिडीओ तसेच या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात केलेल्या कामांचा चित्रफिती दिसून येतात़
त्यानंतर त्या त्या पक्षाच्या अजेंडामध्ये असलेल्या काही योजनांचा उल्लेख दिसतो़ त्यानंतर या उमेदवारांचे छोटेखानी निवेदन व आपल्यालाच निवडून देण्याचे आवाहन केलेले असते़
साधारण १० ते १२ मिनिटांची ही फिल्म पाहण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसते़ साधारण एकाच ठिकाणी काही वेळा दोनदा ही फिल्म दाखविली
जाते़ त्यानंतर डिजिटल रथ पुढच्या ठिकाणी रवाना होतो़ साधारण सकाळपासून सुरू होणाऱ्या या डिजिटल प्रचारात एका दिवसात २० ते २५ ठिकाणी ही फिल्म दाखविली जात असल्याने अन्य माध्यमांपेक्षा याद्वारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवार यशस्वी होताना दिसत आहेत़
शहरातील अनेक प्रभागांची सीमारेषा कागदावर असली तरी प्रत्यक्षात टेम्पोचालकाला अनेकदा ती लक्षात येतेच असे नाही़ त्याशिवाय एका रस्त्याच्या उजव्या बाजूला एक प्रभाग तर, डाव्या बाजूला दुसरा प्रभाग अशी स्थिती दिसून येते़ त्यामुळे अशा रस्त्यावर गर्दी व पार्किंगमुळे जागा मिळाली नाही, तर टेम्पोचालक जागा शोधत पुढे निघतो आणि दुसऱ्या प्रभागात जाऊन ही फिल्म दाखविताना दिसून आले आहे़