विद्यार्थी अनुभवणार आता डिजिटल क्लासरूम
By admin | Published: July 2, 2017 01:59 AM2017-07-02T01:59:29+5:302017-07-02T01:59:29+5:30
जिल्हा परिषद शाळेत आता विद्यार्थी डिजिटल क्लासरूम अनुभवणार आहेत. जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांच्या हस्ते या डिजिटल क्लासरूमचे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : येथील जिल्हा परिषद शाळेत आता विद्यार्थी डिजिटल क्लासरूम अनुभवणार आहेत. जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांच्या हस्ते या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.
तावरे म्हणाल्या, ‘‘डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडणार आहे. आतापर्यंत बारामती तालुक्यात शासकीय अनुदानातून एकूण ४ प्राथमिक शाळांना डिजिटल क्लासरूमचे साहित्य मिळाले आहे. त्यामध्ये सांगवीच्या प्राथमिक शाळेला एकूण ३ डिजिटल रूमचे साहित्य मिळाले आहे. तसेच, या वेळी मोबाईल टॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम असेल.
मोमीन अल्ताफ यांनी याबाबत माहिती दिली. मोबाईल टॅब आणि डिजिटल क्लासमुळे सर्व चित्ररूपी माहिती मिळून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. आधुनिक काळानुसार ज्ञानरूपी प्रगतीच्या वाटेने सर्व विद्यार्थी घडणार आहेत. ९ जानेवारी २०१७च्या जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शासन परिपत्रकानुसार डिजिटल प्रत्येकी एक वर्ग निर्मितीसाठी प्रत्येक वर्गाकरिता २८,६२७ रुपयांच्या मर्यादेखाली साहित्य उपलब्ध होईल. डिजिटल क्लासरूममुळे आता इंग्लिश मीडियमच्या बरोबरीने माराठी शाळाही प्रगतीच्या दिशेने पुढे जाणार आहेत.
सर्वसामान्य लोकांची मुले मराठी शाळेत शिकत असतात. मराठी शाळेत मुलांना पाठविणे आत्ताच्या काळात कमी लेखले जाते. परंतु, मराठी शाळेतील डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. तसेच, मुलांनाही त्याची गोडी निर्माण होईल. यामुळे आता पालकवर्गाचा कल मराठी शाळेकडे निश्चित होईल. यामुळे या डिजिटल क्लासरूमचे सर्वांनी स्वागत केले.
या वेळी सरपंच सीमा तावरे, उपसरपंच भानुदास जगताप, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब तावरे, ग्रामपंचायत सदस्य पोपट तावरे, मुख्याध्यापक संजय गायकवाड, शिक्षक नारायण मोहिते, मोमीन अल्ताफ, बाळासाहेब जगताप, धनश्री तावरे, आशा जगताप, रंजना पवार, मनीषा तावरे, सतीश धुमाळ, शिक्षक शैला हेंद्रे, पूजा शेटे, अश्विनी साळुंखे, नीलिमा माळवदे,जयश्री दगडे, रतन बामणे, चंद्रकांत भोसले, शिवाजी इंगळे, सुरेश राजगुरू आदी शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी उपस्थित होते.