पीएमपी बससेवेमध्ये डिजिटल डिस्प्लेच बंद; प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:59 IST2024-12-14T11:58:30+5:302024-12-14T11:59:13+5:30
सुधारणांसाठी घोषणाच, प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही

पीएमपी बससेवेमध्ये डिजिटल डिस्प्लेच बंद; प्रवाशांची गैरसोय
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) अंतर्गत चालणाऱ्या बससेवेत प्रवाशांची गैरसोय वाढत आहे. बहुतांश बसमधील डिजिटल फलक बंद असल्याने मार्गाची माहिती स्पष्ट मिळत नसल्यामुळे, परिणामी प्रवाशांना अंदाज घेत बस पकडावी लागते. त्यामुळे डिजिटल फलकांचा बिघाडामुळे प्रवाशांची धावपळ होत आहे.
पीएमपीच्या बसमध्ये डिजिटल फलक कार्यान्वित नसल्याने मार्ग क्रमांक आणि थांब्यांची माहिती प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना गोंधळाचा सामना करावा लागत आहे. जून महिन्यात पीएमपीएमएलने ४०० स्व-मालकीच्या बसेसवरील बिघडलेले डिजिटल फलक बदलण्याची योजना जाहीर केली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता यामध्ये फारशी प्रगती झालेली नाही.
पीएमपीच्या ताफ्यात तब्बल १,७०० बस पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए परिसरात सेवा देतात. यात पीएमपीच्या १००४ आणि ठेकेदारांचे ९४२ असे १ हजार ९४६ बसेस आहेत. त्यातून १७०० बसेस मार्गावर धावतात. यातून ही पीएमपीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसेसवर डिजिटल फलक कार्यरत नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
डिजिटल फलक दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असेल, तर किमान तात्पुरते फलक लावावेत, जे वाचण्यायोग्य आणि सर्वांना स्पष्ट दिसतील. डिजिटल फलक बंद असल्याने बस कोणत्या थांब्यावर थांबणार हे समजत नाही आणि त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. - स्वप्नील जाधव (प्रवासी)
“फलक बंद असल्यामुळे बसमध्ये चढताना गोंधळ उडतो. योग्य माहिती नसल्याने अनेकवेळा चुकीच्या बसमध्ये चढावं लागलं होतं. डिजिटल फलक पीएमपीने लवकर दुरुस्त करावे. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सोयिस्कर होईल. - रेखा पाटील (प्रवासी)
डिजिटल फलक हे प्रवाशांसाठी महत्त्वाचे असतात. ते सुरू नसल्यामुळे नवीन मार्ग कळण्यात अडचण येते. डिजिटल फलक सुरू नसल्याने वाहनचालक किंवा वाहकाला वारंवार थांब्याविषयी विचारावे लागते. - नेहा जगताप (प्रवासी)
“पीएमपीच्या मालकीच्या असणाऱ्या सर्व बसेसमध्ये डिजिटल डिस्प्ले फलकाचे काम सुरू आहे. ज्या-ज्या बसेसमध्ये डिजिटल डिस्प्ले सुरू नाही अशा सर्व बसेसची दुरुस्ती केली जात असून, लवकरच काम पूर्ण होईल. - सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी.