डिजिटल इंडियाचे शट डाऊन, ‘स्मार्ट’ शाळा संगणक लॅब बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:40 AM2018-08-31T01:40:53+5:302018-08-31T01:41:29+5:30
तब्बल १,६८६ संगणक बंद अवस्थेत : एकही संगणक शिक्षक नाही, तरीही निधीचा घाट
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कारभारामुळे ‘स्मार्ट’ पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमधील सर्व संगणक लॅब सध्या धूळ खात पडून आहेत. विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या लॅबमधील तब्बल १,६८६ संगणक बंद पडले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ही परिस्थिती आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांप्रमाणे संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून अद्ययावत संगणक लॅब सुरू करण्यात आल्या. यासाठी राज्य शासनाकडून संगणक शिक्षकांची ४८ पदे मजूरदेखील करून घेतली. शहरात महापालिकेच्या २७९ शाळा असून, प्रत्येक इमारतीमध्ये एक संगणक लॅब सुरू करण्यात आली. शहरामध्ये एकूण १२६ संगणक लॅब सुरू करण्यात आल्या. यात एका लॅबमध्ये सरासरी २० ते २५ संगणक बसविण्यात आले. एक लॅब सुरू करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.
परंतु, गेल्या दोन वर्षांपासून संगणक प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षकच उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या शाळांमधील संगणक लॅब धूळ खात पडून आहेत. यामध्ये १२६ पैकी ८५ संगणक लॅब सुरू असल्याचे प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले असेल, तरी प्रत्यक्षात एकही संगणक सध्या सुरू नाही.
वॉर्डस्तरीय निधीतूनही संगणकखरेदीचा आग्रह
महापालिकेच्या वतीने सर्व शाळांसाठी संगणक लॅबअतंर्गत प्रत्येकी २० ते २५ संगणक खरेदी करण्यात आले. लॅबमधील हे सर्व संगणक शिक्षक नसल्याने गेल्या काही वर्षांपासून बंद पडले आहेत. त्यात आता पुन्हा ई-लर्निंग प्रणालीअतंर्गत मोठ्या प्रमाणात सर्व शाळांसाठी संगणक व डिजिटल बोर्ड खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापूर्वीच सध्या काही नगरसेवकांनी आपल्या वॉर्डस्तरीय निधीतूनदेखील संगणकखरेदी केली असून, हे संगणक धुुळीत पडलेल्या संगणक लॅबमध्येच आणूण टाकण्यात आले आहेत.
नव्याने २१ कोटी खर्चून ई-लर्निंगचा घाट
1 संगणक लॅबचा कोट्यवधी रुपयांचा खर्च धुळीस मिळाला असताना प्रशासनकडून पुन्हा नव्याने ई-लर्निंगच्या नावाखाली तब्बल २१ कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे.
2या ई-लर्निंगसाठी महापालिकेने मंजुरी दिली असून, लवकरच बंद पडलेल्या संगणक लॅबमध्येच या नव्याने ‘ई-लर्निंग प्रणाली आणि व्हर्च्युअल क्लासरूम’ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेले साहित्यदेखील शाळांमध्ये येऊन पडले आहे.