‘पीएमपी’ची डिजिटलकडे वाटचाल; सर्व कार्यालये होणार ऑनलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 08:27 PM2020-05-28T20:27:25+5:302020-05-28T20:30:02+5:30
प्रत्येक बसची देखभाल-दुरूस्ती, कर्मचाऱ्यांची माहिती मुख्य कार्यालयात एका क्लिकवर कळणार
पुणे : बहुतेक कामे कागदावरच सुरू असलेले पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) लवकरच 'पेपरलेस' म्हणजे 'डिजिटल' होणार आहे. 'पीएमपी'ची सर्व आगार कार्यालये, वर्कशॉप, भांडार एकमेकांशी जोडली जाणार आहेत. आगारांमध्ये वापरण्यात येणारा प्रत्येक सुट्टे भाग, प्रत्येक बसची देखभाल-दुरूस्ती, कर्मचाऱ्यांची माहिती मुख्य कार्यालयात एका क्लिकवर कळणार आहे. त्यामुळे विविध मार्गाने सुरू असलेली अनियमितता दुर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या डिजिटल युगात पीएमपीचा कारभार कागदोपत्रीच होत आहे. आगरांमधून अधिकृत कागद आल्याशिवाय पुढील कामे होत नाहीत. कोणत्या आगाराची सद्यस्थिती काय आहे, याची दैनंदिन माहिती स्वारगेट येथील मुख्य कार्यालयाला कळत नाही. आगारांमधील बसच्या देखभाल-दुरूस्तीबाबत मुख्य अभियंता अनभिज्ञ असतात. सध्या किती बस मार्गावर आहेत, किती बस कोणत्या कारणासाठी उभ्या आहेत, कोणत्या आगारातील भांडारामध्ये कोणते व किती सुट्टे भाग आहेत, त्यांची मागणी, कंपन्या व दर्जा याची पुरेशी माहिती नसते. आगारातून बाहेर पडलेल्या बसमध्ये असलेल्या त्रुटी कागदावरच राहतात. त्या वरिष्ठांपर्यंत पोहचत नाहीत. त्याचा पाठपुरावा होत नाही. परिणामी सातत्याने ब्रेकडाऊन होते. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षा नयना गुंडे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या डिजिटायझेशनमुळे या गोष्टींना आता आळा बसणार आहे.
..........................................
असे होईल डिजिटायझेशन?
पीएमपीचे एकुण १३ आगार आहेत. तसेच दोन-तीन आगार वगळता अन्य आगारांमध्ये बसच्या देखभाल-दुरुस्तीचे कामे होतात. तिथे भांडार विभाग आहे. ही सर्व आगारे व भांडार विभाग स्वारगेट येथील मुख्य कार्यालयाशी संगणक प्रणालीद्वारे जोडले जाणार आहेत. आगारामध्ये उपस्थित कर्मचारी, त्यांना दिलेली कामे, सुस्थितीतील व बंद बस, बसमधील त्रुटी, भांडार विभागात उपलब्ध सुट्टे भाग, मार्गावर जाणाऱ्या बसची सर्वप्रकारची माहिती सातत्याने अद्ययावत केली जाईल.
...........................
चालक-वाहकांना ड्युटीचे एसएमएस
चालक व वाहकांना कोणत्या मार्गावर ड्युटी आहे, बस कोणती, ती कुठे असेल याची माहितीही एसएमएसद्वारे पाठविण्याचे नियोजन आहे. सध्या त्यांना आगारात आल्यानंतर याबाबत माहिती मिळते.
बसमधील डिझेल कळणार
सध्या ताफ्यात असलेल्या बसमध्ये किती डिझेल भरले, फेरीनंतर किती गेले, किती शिल्लक राहिले हे कळण्यासाठी इंधन टाकीला सेन्सर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक बसचा इंधन खर्चही लगेच समजणार आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम व कार्गोएफएल यांच्या सहकायार्ने रोड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आरटीएमएस) ही संगणकप्रणाली विकसित केली जात आहे. त्याआधारे पीएमपीची डिजिटल वाटचाल सुरू झाली आहे. टप्याटप्याने हे काम पुर्ण केले जातील. कर्मचाºयांना आॅनलाईन प्रशिक्षणही दिले जात आहे.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी
-----------