पुरस्कार घेणाऱ्या पालिकेच्या डिजिटल सेवा ऑफलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:34 AM2019-03-01T01:34:27+5:302019-03-01T01:34:29+5:30
डिजिटल पेमेंट सेवेसाठी मिळाला पुरस्कार : विविध १११ सेवांसाठी नागरिकांना थांबावे लागते रांगांमध्ये
पुणे : महापालिकेला नुकताच केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी डिजिटल पेमेंटसाठी पुरस्कार दिला. परंतु आजही महापालिकेच्या तब्बल १११ सेवा आॅफलाइन असून, नागरिकांना रागांमध्ये थांबवून सतत महापालिकेच्या विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
महापालिकेच्या वतीने नागरिकांना कर, पाणीपट्टी, विविध प्रकराच्या एनओसी, शहराच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे परवाने, विविध कारणांसाठी ना हरकत प्रमाणपत्र आदी विविध स्वरूपाच्या तब्बल १११ सेवा नागरिकांसाठी पुरविण्यात येतात. यामध्ये सेवा हमी कायद्यातंर्गत ५० प्रकारच्या सेवांचा समावेश आहे.
या सर्व सेवांसाठी महापालिकेला काही प्रमाणात सेवा शुल्क भरावे लागते. या सर्व सेवांसाठी नागरिकांना संबंधित विभागांकडे जाऊन अर्ज दाखल करणे, चलन घेणे, पैसे भरणे व चलन अर्जासोबत संबंधित विभागाकडे दाखल करणे यामध्ये नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा वाया जातो.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दोन वर्षांपूर्वी पुणे शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली. या स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत शहरामध्ये महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा आॅनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र व राज्य शासनाकडून देखील सातत्याने आॅनलाइन पेमेंट पद्धतीचा आग्रह धरीत आहे. नागरिकांना घरबसल्या कोणत्याही सरकारी कामांसाठी आॅनलाइन पद्धतीने पेमेंट करता यावे यासाठी खास ‘भीम अॅप’ सुरू केले आहे. परंतु अद्यापही महापालिकेकडून विविध सेवांसाठी आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले जात नाही.
याबाबत सजग नागरिक मंचच्या वतीने आयुक्त सौरभ राव यांना लेखी पत्र देऊन महापालिकेच्या १११ प्रकारच्या सेवा आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
सुविधा आॅफलाइन असताना पुरस्कार कसा?
केंद्र शासनाने पुणे महापालिकेला डिजिटल पेमेंटच्या सुविधेसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महापालिकेकडून तब्बल १११ सेवा देण्यात येतात. यापैकी सध्या केवळ मिळकतकर भरण्याची सुविधा आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आॅनलाइन सेवा दिल्या जात नसताना केंद्राचा डिजिटल पेमेंट सेवेचा पुरस्कार मिळालाच कसा? सजग नागरिक मंचच्या वतीने सन २०१८ पासून महापालिकेकडे सर्व सेवा आॅनलाइन करण्यासाठी मागणी सुरू आहे. परंतु अद्यापही या सेवा आॅनलाइन झाल्या नाहीत. परंतु आता तरी किमान डिजिटल पुरस्काराची लाज बाळगून या सेवा आॅनलाइन करा.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच प्रमुख