मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच डिजिटल कामाचे वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 08:53 PM2018-08-01T20:53:14+5:302018-08-01T20:58:49+5:30
उस्मानाबाद जिल्ह्याने ९२.७९ टक्के सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीचा देत, राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
पुणे : शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा देण्याची घोषणा सरकारने केली असली, तरी मुख्यमंत्र्यांच्या नागपुर जिल्ह्यातच अवघे ५.०८ टक्के सातबारा-डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगरमध्ये शून्य टक्के काम झाले असून, १५ जिल्ह्यांनी सातबारा संख्येच्या दहा टक्के देखील काम केलेले नाही. उस्मानाबाद जिल्ह्याने ९२.७९ टक्के सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीचा देत, राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळविणे सोयीचे जावे यासाठी राज्य सरकारने १ मे पासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा उतारा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात सर्व्हरवर ताण आल्याने ही सेवा कोलमडली. काही जिल्ह्यात तर १८ जुलै पर्यंत काम ठप्प पडले होते. राज्यातील अडीच कोटी सात-बारा उतारा आॅनलाईन झाले आहेत. तांत्रिक अडचणी उद्भविल्याने आॅनलाईन प्रिंट घेऊन, सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची स्वाक्षरी घ्यावी लागत आहे.
राज्यात १९ जुलै पर्यंत सातबारा उताऱ्याच्या सर्व्हरमधील अडचणी दूर करण्यात आल्याचे ई फेरफार प्रकल्पाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्यात ४३ हजार ९४६ गावांमध्ये २ कोटी ४९ लाख ५९ हजार ९५ सर्व्हे क्रमांक आहेत. त्यातील ४१ लाख ७५ हजार सातबारा उतारे १७ जुलै पर्यंत डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले होते. तसेच, २९ जुलै पर्यंत त्यात ४२ लाखांपर्यंत वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.
राज्यसरकारने डिजिटल स्वाक्षरीच्या सातबाराची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. मात्र, त्यात मुख्यमंत्र्यांचा नागपुर जिल्हाबराच मागे आहे. या जिल्ह्यातील १ हजार ९५६ गावांमधील ७ लाख ७३ हजार ८८२ सर्व्हे क्रमांकापैकी अवघ्या ३८ हजार ८३३ सर्व्हे क्रमांकावरच डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ७१८ गावे असून, २ लाख ९० हजार ७८ सर्व्हे क्रमांक आहेत. त्यातील तब्बल २ लाख ६९ हजार १७६ सातबारा उतारे (९२.७९ टक्के) डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत.
------------------------
मोठे जिल्हे डिजिटल कामात मागे
राज्यातील सुमारे अडीच कोटी सातबारा उताऱ्यांपैकी तब्बल ४४ लाख सातबारा उतारे सिंधुदूर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यात आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात १६ लाख ३२ हजार सातबारा उतारे असून, येथे १७ जुलै पर्यंत शून्य टक्के काम झाले होते. पुणे अणि साताऱ्यात अनुक्रमे साडेसात आणि २.८७ टक्के काम झाले आहे.