ग्रंथालयांना ‘डिजिटायझेशन’चा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:10 AM2018-11-13T02:10:03+5:302018-11-13T02:10:25+5:30
पुणे नगर वाचन मंदिर : जानेवारीपासून कामाला सुरुवात होणार
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : दुर्मिळ पुस्तके, हस्तलिखिते हा दस्तावेज जतन केला जावा, ग्रंथांचा अमूल्य ठेवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जपला जावा, यादृष्टीने डिजिटायझेशन प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. काळाची पावले ओळखत पुणे नगर वाचन मंदिराने दुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला असून, जानेवारीपासून मुख्य प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यभरातील व्यक्ती, संस्था, ग्रंथालयांकडे उपलब्ध असलेली दुर्मिळ पुस्तकेही वाचन मंदिराकडून कोणतेही शुल्क न आकारता डिजिटाईझ करून दिली जाणार आहेत.
दुर्मिळ पुस्तके अथवा प्रती काळाच्या ओघात सहज उपलब्ध होणे अवघड होऊन बसते. पुस्तकांचे स्कॅनिंग, तसेच डिजिटायझेशन केल्यास हा ठेवा कायमस्वरुपी संगणकीकृत करून जतन केला जाऊ शकतो. यासाठीच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत पुणे नगर वाचन मंदिराने डिजिटायझेशनचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षभरात सात ते आठ लाख रुपये खर्च करून सुमारे तीन ते चार लाख पानांचे डिजिटायझेशन करण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी संस्थेने विशेष डिजिटायझेशन समिती नेमली असून, प्रसाद जोशी या समितीचे प्रमुख आहेत, अशी माहिती कार्यवाह अरविंद रानडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
संस्थेतील पुस्तकांबरोबरच राज्यभरातील ग्रंथालये, संस्था यांनाही त्यांच्याकडील दुर्मिळ पुस्तके, नकाशे, फोटो, पोथ्या, हस्तलिखिते पुणे नगर वाचन मंदिराकडे सोपविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुस्तकांची स्थिती, पानांचा दर्जा आदींची तपासणी करून नि:शुल्क डिजिटायझेशन करून दिले जाणार आहे. यासाठी संस्थेतर्फे राज्यभरातील ग्रंथालयांना पत्रेही पाठवण्यात आली आहेत. या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी, चिपळूण, भोर, वाई आदी भागांतील ग्रंथालयांनी पुणे नगर वाचन मंदिराशी संपर्क साधला आहे. या भागांतील ग्रंथालयांमध्ये संस्थेचे प्रतिनिधी स्वत: जाऊन पुस्तकांची पाहणी, तपासणी करणार आहेत. एसपी महाविद्यालयात सुमारे पाच-सहा हजार दुर्मिळ पुस्तके उपलब्ध असून, महाविद्यालयाने संस्थेशी संपर्क साधला आहे.
पुस्तकांची तपासणी होणार
डिजिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये पुस्तकांची तपासणी, पानांचे स्कॅनिंग, इंडेक्स तयार करणे, पिवळी अथवा जीर्ण झालेली पाने शक्य तितकी पांढरी आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणे, सीडी स्वरुपात जतन आदी टप्प्यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या टप्प्यात संस्थेकडे उपलब्ध असलेली कोल्हापूर, बेळगाव गॅझेट, सूपशास्त्र, मल्लविद्येचे चार खंड, व्यायामकोशाचे १० खंड आदींचा समावेश आहे.
या प्रक्रियेमध्ये सरसकट डिजिटायझेशन न करता सुरुवातीला कोणती पुस्तके अद्याप डिजिटाईझ झालेली नाहीत याचा शोध घेणे, पुस्तकांचे वर्गीकरण, स्कॅनिंग आदी टप्प्यांवर काम केले जाणार आहे.
पुणे नगर वाचन मंदिरातर्फे जानेवारी महिन्यापासून डिजिटायझेशनला सुरुवात केली जाणार आहे. वर्षभरात सुमारे तीन ते चार लाख पानांचे डिजिटायझेशन करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेतील पुस्तकांबरोबरच राज्यभरातील ग्रंथालये, संस्था आणि व्यक्ती यांच्याकडील दुर्मिळ पुस्तके, पोथ्या, नकाशे, हस्तलिखिते, फोटो संस्थेकडे सोपविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाचन मंदिराकडून डिजिटायझेशन नि:शुल्क करून दिले जाणार आहे.
- अरविंद रानडे, कार्यवाह