सुरक्षिततेसाठी डिजिटलायजेशन
By Admin | Published: August 2, 2016 01:44 AM2016-08-02T01:44:33+5:302016-08-02T01:44:33+5:30
महाविद्यालय परिसरातील टवाळखोरीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांना चिंता असते.
पिंपरी : महाविद्यालय परिसरातील टवाळखोरीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांना चिंता असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवडमधील प्रतिभा शिक्षण संस्थेने डिजिटलायजेशनचा वापर केला आहे. त्यातून पाल्याची उपस्थिती, गैरहजेरी, तो आता कोठे आहे, ही माहिती पालकांना मिळणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे महाविद्यालय परिसरात होणाऱ्या टवाळखोरीलाही आळा बसणार आहे.
एकविसावे शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. देशाचे भवितव्य हे तरुणांच्या हाती आहे. त्यामुळे ‘स्मार्ट नागरिक’ घडविण्यासाठी प्रयत्न विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून केले जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अॅन्ड कॉम्प्युटर स्टडीज् महाविद्यालय आहे. तिथे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना टेक्नोसेव्ही बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
सचिव डॉ. दीपक शहा यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात डिजिटलायजेशन करण्यात आले आहे. दहावीनंतर मुले कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात. त्या वेळी आपला पाल्य महाविद्यालयात जातो किंवा नाही, याबाबतची खातरजमा करण्याची यापूर्वी कोणतीही पद्धत नव्हती. त्यामुळे मुलांची चिंता पालकांना सतावत असायची. मात्र, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामुळे पाल्याची चिंता करण्याचे आता कोणतेही कारण नाही. कारण, प्रतिभा संस्थेने या विषयी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. मुलगा महाविद्यालयात कधी आला, त्याची महाविद्यालय प्रवेशाची वेळ काय, तो किती तासिकांना उपस्थित राहिला,
तो किती वाजता बाहेर पडला, याची माहितीही एसएमएसद्वारे कळविली जाते. (प्रतिनिधी)
टवाळखोरांवर नियंत्रण
महाविद्यालयाच्या आवारात अन्य विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे टवाळखोरांचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. तसेच काही टवाळखोर थेट आपल्या मित्राबरोबर वर्गात बसत असत. त्यामुळे महाविद्यालयांच्या आवारात छेडछाडीच्या घटना घडत असत. मात्र, डिजिटलायजेशनने टवाळखोरीवर नियंत्रण आणण्याचे काम केले आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून टवाळखोरीवर नियंत्रण आणता येणार आहे, असे डॉ. कांकरिया यांनी सांगितले.
>माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही पाल्याच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला बारकोडचे ओळखपत्र दिले आहे. हे ओळखपत्र स्कॅन करूनच विद्यार्थ्यांना आवारात प्रवेश दिला जातो. त्यानंतर प्रत्येक तासिकेलाही आयकार्ड स्कॅन करून हजेरी घेण्यात येते. त्यामुळे मुलाचा शाळा प्रवेश, तो किती तासिकांना होता किंवा नाही, त्याच्या हजेरीविषयीची माहिती पालकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले आहे. हा उपक्रम एक जुलैपासून सुरू केला आहे.
- डॉ. राजेंद्र कांकरिया (प्राचार्य)