मध्यवर्ती व्यापारी पेठामधील कोंडी होणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:37+5:302021-03-13T04:16:37+5:30
पुणे : शहरातील मध्यवस्तीतील समांतर असलेले बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे रस्ते मध्यवस्तीतील सर्वात मोठ्या बाजारपेठेला जोडतात. गेल्या ...
पुणे : शहरातील मध्यवस्तीतील समांतर असलेले बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे रस्ते मध्यवस्तीतील सर्वात मोठ्या बाजारपेठेला जोडतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते विस्तारलेले नाहीत. वाहनांची संख्या वाढल्याने याभागातील कोंडी प्रचंड वाढली आहे. अतिक्रमणे वाढत चालली आहेत. याच रस्त्यावर असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या सौंदर्याला बाधा येऊ लागली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर हा रस्ता ''मॉडर्न'' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारवाडा ते दत्तमंदिर तसेच दत्तमंदिर ते लोकमान्य टिळक पुतळा चौक या दरम्यानचा रस्ता ‘मॉडेल रोड’ म्हणून विकसित करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. गर्दी, दाटीवाटी आणि अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या या रस्त्यावरील वाहतूक समस्या दूर करण्यासोबतच या रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यात येणार आहे.
शिवाजी रस्त्यावर शनिवारवाडा, लाल महाल, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, नानावाडा, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, महात्मा फुले मंडई अशी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. यासोबतच रविवार पेठेतील बोहरी आळी, इलेक्ट्रिक व मोबाईल मार्केट, पुस्तक मार्केट, भाजी मंडई अशी बाजारपेठ आहे. पारंपरिक व्यावसायिकांची वसाहत असलेल्या कसबा पेठेलाही हाच रस्ता जोडतो. त्यामुळे या रस्त्याचा विकास करून ऐतिहासिक ठिकाणे आणि बाजरापेठेची सोय दोन्हीही हेतू साध्य करण्याचा मानस असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
-----
गेल्या अनेक वर्षात या रस्त्याच्या विकासनावर फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. या रस्त्यावर अनके वर्षात नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली नाही. आम्ही पुढील २०-२५ वर्षांचा विचार करून भूमिगत ड्रेनेज लाईन आणि जलवाहिनी टाकणार आहोत. यासोबतच प्रशस्त आणि देखणे पदपथ विकसित केले जाणार आहेत. रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर लावण्यात येणार असून पथदिवे आकर्षक असणार आहेत. हा रस्ता पुढील अनेक वर्षे पुन्हा करावा लागणार नाही. व्यापारी, पादचारी, वाहनचालक सर्वांनाच त्याचा व्यवस्थित वापर करता येईल.
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
------
शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने तसेच याभागात शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने वर्दळही अधिक आहे. वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. याभागातील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता विकसित झाल्यास मोठा प्रश्न मार्गी लागेल. विकासनाची नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती.
- पियुष शहा, नागरिक
-------
रस्ता अरुंद झाल्याने तसेच कोंडीची समस्यां निर्माण झाल्याने व्यवसायातही अडचणी येत आहेत. हा रस्ता प्रशस्त होणे तसेच नियोजनबद्ध पद्धतीने विकसित होणे आवश्यक आहे. पालिकेकडून जर हे काम केले जाणार असेल तर व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. पालिकेने तात्काळ हे काम सुरू करावे.
- किशोर कदम, तरकारी व्यापारी, म. फुले मंडई