विठाबार्इंचे स्मारक वर्षभरात उभारणार : दिलीप कांबळे
By admin | Published: April 16, 2015 11:06 PM2015-04-16T23:06:28+5:302015-04-16T23:06:28+5:30
लोकनाट्य तमाशा सम्राज्ञी आणि राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी शासन पुढाकार घेईल.
नारायणगाव : लोकनाट्य तमाशा सम्राज्ञी आणि राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी शासन पुढाकार घेईल. पुढील वर्षापर्यंत त्यांचे स्मारक उभारण्यात येईल. तसेच तमाशा कलावंत व त्यांची मुले यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
तमाशा सम्राट भाऊ बापू मांग व विठाबाई मांग नारायणगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमप्रसंगी कांबळे यांनी धावती भेट देवून तमाशा कलावंतांच्या प्रश्नांची माहिती घेतली. या वेळी विठाबाई यांच्या मुलांनी तसेच येथील तमाशा पंढरीतील तमाशा फड मालकांनी कांबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
कांबळे यांनी सांगितले, की विठाबाईंच्या स्मारकांचा प्रश्न प्रलंबित आहे, स्मारकासाठी ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करुन द्यावी. वर्षभरात स्मारक उभारण्यात येईल, असे आश्वासन देऊ. स्मारकासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करुन देईन, वेळप्रसंगी केंद्र सरकारकडून निधी आणू; परंतु विठाबार्इंचे स्मारक होईलच, असे आश्वासन त्यांनी दिले. पेन्शन योजनेमध्ये भरीव अशी वाढ केली जाईल, तमाशा कलावंत हे भटकंतीवर असतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते, कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासन विशेष तरतूद करेल, त्यांच्या जातीच्या दाखल्यासाठी जाचक अटी शिथिल करुन त्यांना दाखले कसे मिळतील याकडे जातीने लक्ष दिले जाईल, कलावंतांच्या मनधन, पॅकेज यासाठी शासन लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावेल, असे आश्वासन कांबळे यांनी दिले. या वेळी येथील मुक्ताबाई देवस्थान इस्टचे अध्यक्ष एकनाथ शेटे व तमाशा पंढरीच्या वतीने विठाबाई यांच्या मुलांनी दिलीप कांबळे यांचा सत्कार केला. बसस्थानकासमोरील विठाबाई नारायणगावकर यांच्या पुतळ्याला कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला.