हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर
By अजित घस्ते | Published: May 9, 2023 02:22 PM2023-05-09T14:22:47+5:302023-05-09T15:20:35+5:30
उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड
पुणे : पुणे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या "सभापती" पदी निवड मंगळवारी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनलचे दिलीप काशिनाथ काळभोर" यांची तर "उपसभापती" पदी लोणी कंद येथील "रवींद्र नारायण कंद" यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिलीप काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाली आहे. तर रविंद्र कंद हे पहिल्यांदांचा निवडुन आले आहेत.
सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी हवेली बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण ) तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीसाठी सभापतीपदासाठी दिलीप काळभोर तर उपसभापदासाठी रविंद्र कंद यां दोघांचे उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी वरील दोघांच्या निवडीची घोषणा केली.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांच्यासाठी नुकतीच निवडणुक झाली होती. या झालेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील "अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या "अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल" ला अवघ्या 2 जागांच्यावर समाधान मानावे लागले होते. तर व्यापारी व हमाल-मापाडी गटातुन तीन उमेदवार स्वतंत्र निवडून आले यांमध्ये व्यापारी आडते संघातून गणेश घुले, अनिरुद्ध भोसले तर हमाल मापाडी मधून संतोष नांगरे संचालक झाले आहेत.
दरम्यान सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी जाहीर होताच, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकास दांगट, बाजार समितीचे वरीष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप काळभोर व रविंद् कंद यांना पुष्पहार घालुन अभिनंदन केले. यावेळीं मार्केटयार्ड आवारात गुलाल लावून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच बाजार परिसरातून सर्व संचालक मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.