दिलीप कोल्हटकर अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 03:58 AM2018-05-06T03:58:41+5:302018-05-06T03:58:41+5:30
गकर्मी, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार अशा व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंद्वारे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांना नाट्यक्षेत्रातील मंडळींनी साश्रू नयनांनी शनिवारी अखेरचा निरोप दिला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
पुणे - रंगकर्मी, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार अशा व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंद्वारे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांना नाट्यक्षेत्रातील मंडळींनी साश्रू नयनांनी शनिवारी अखेरचा निरोप दिला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
दिलीप कोल्हटकर यांची दीर्घ आजाराने शुक्रवारी सकाळी प्राणज्योत मालवली; मात्र मुलगा अमेरिकेत वास्तव्यास असल्याकारणाने तो आल्यानंतर, त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अभिनेते अमोल पालेकर, मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, नाट्य समीक्षक माधव वझे यांच्यासह रंगभूमीच्या क्षेत्रातील काही मान्यवर, मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. कोल्हटकर यांच्या निधनाने रंगभूमी पोरकी झाली असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
दिलीप आणि माझ्यात एक वेगळी मैत्री होती. मुंबईला गावदेवीला राहायला होतो, तेव्हा माझ्या घरी अनेक नाट्यवेडी मंडळी हक्काने येऊन राहायची. त्यामध्ये दिलीपदेखील असायचा. दिलीप बँक आॅफ बडोदामध्ये कामाला होता आणि मी बँक आॅफ इंडियामध्ये होतो. आंतरबँक नाट्य स्पर्धेत आम्हाला अचानक भाग घ्यायला सांगितले; मात्र आमच्या हातात केवळ दोनच दिवस होते. आम्ही नाटककार रत्नाकर मतकरी यांच्याकडे गेलो. ते म्हटले दोन दिवस नाही तीन दिवस हवेत. या स्पर्धेमध्ये बँक आॅफ बडोद्याचे तिसरे नाटक होते आणि आमचे दुसरे. दिलीपला सांगून आम्ही आमचे नाटक एक दिवस पुढे नेण्याची विनंती केली आणि त्यानेही स्पर्धा विसरून त्यांचे नाटक दुसरे घेतले आणि आम्हाला त्यांच्या जागी सादर करण्याची संधी दिली.
अशी निखळ स्पर्धा आज कुठेच पाहायला मिळत नाही, अशा शब्दांत अमोल पालेकर यांनी कोल्हटकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
माधव वझे यांनी दिलीप कोल्हटकर हा प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीला साधणारा दुवा असल्याचे सांगितले. मोहन जोशी यांनी कोल्हटकर यांच्या निधनाने रंगभूमीचे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त
केली.
दिलीप माझा मावस भाऊ होता. त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही; पण त्याचे काम जवळून पाहिले. रंगभूमीला प्रकाशमान करणारे त्याचे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत ज्योती सुभाष यांनी कोल्हटकर यांना श्रद्धांजली वाहिली.