मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक आहे म्हणून मनाला वाटेल ते करणार का?- दिलीप मोहिते-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:31 AM2023-04-11T09:31:26+5:302023-04-11T09:33:42+5:30
आम्ही हे खपवून घेणार नसल्याचेही आमदार मोहिते यांनी उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले...
राजगुरुनगर (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर काही कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यावरून आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी टी अँड टी म्हणजे तांदळे आणि थोरात कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महत्त्वाचे म्हणजे थोरात हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक झाला म्हणजे मनाला वाटेल ते करणार का? आम्ही हे खपवून घेणार नसल्याचेही आमदार मोहिते यांनी उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बाह्यवळण काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही दिवसांत टोल आकारणी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, वरची भांबूरवाडी, तुकाईवाडी परिसरात सेवा रस्त्याची कामे ठेकेदाराने अपूर्ण ठेवली आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. घर एका बाजूला तर शेती विरुद्ध बाजूला किंवा अर्धे क्षेत्र अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. पूर्वी वापरात असलेला रस्ते बाह्यवळणात गेले आहेत. त्यामुळे वाळुंज वस्तीतील दीडशे घरांकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. महिला व शालेय विद्यार्थ्यांना येणे-जाणे धोकादायक बनले आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा पाठपुरावा केला, निवेदने दिली. मात्र, अधिकारी ठेकेदारांनी कानाडोळा केला.
दोन महिन्यांपूर्वी तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थांच्या आग्रहाखातर ठेकेदार टी अँड टी कंपनीच्या प्रमुखांसह महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांची एकत्रित बैठक झाली. आश्वासने देण्यात आली, कारवाई काही झाली नाही. म्हणून सोमवारी (दि. १०) आमदार मोहिते-पाटील, भांबूरवाडीचे सरपंच विजय थिगळे, सुभाष गाढवे, प्रवीण कोरडे, किशोर रोडे, माजी सरपंच सुर्वे पाटील यांच्यासह दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
यावेळी आमदार मोहिते-पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असलेल्या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पोलिसांनी बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक राजगुरुनगर शहरातील जुन्या रस्त्यावर वळवली. तरीही महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाले होते. सेवा रस्त्याची कामे पूर्ण झाल्याशिवाय टोल नाका सुरू करणार नाही, असे महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांनी मोबाइलवर सांगितले. त्यानंतर मोहिते-पाटील व ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.