Diljit Dosanjh : कोथरुडकरांचा विरोध झुगारून पोलिस बंदोबस्तात ‘दिलजीत कॉन्सर्ट’
By दीपक होमकर | Published: November 25, 2024 08:38 PM2024-11-25T20:38:40+5:302024-11-25T20:42:00+5:30
कोथरुड : कोथरुड येथील काकडे फार्म्समध्ये पंजाबी गायक रविवारी दिलजीत दोसांज यांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मद्यविक्री होणार होती, ...
कोथरुड : कोथरुड येथील काकडे फार्म्समध्ये पंजाबी गायक रविवारी दिलजीत दोसांज यांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मद्यविक्री होणार होती, तसेच कार्यक्रमामध्ये येणाऱ्या तरुण, तरुणींच्या गर्दीमुळे परिसरात मोठी वाहतूककोंडी होईल या कारणाने कार्यक्रमाला कोथरुडकांनी विरोध करत आंदोलन केले होते. त्याची दखल घेत मंत्री आणि नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनीही कार्यक्रम रद्द करावे अशी सूचना पोलिस आयुक्तांना दिली असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. मात्र तरीही रविवारी दिलजीत यांचा कार्यक्रम पोलिसांच्या बंदोबस्तात यशस्वी पार पडला.
याबाबत माहिती अशी की, कोथरुड येथील काकडे फार्म्स येथे ‘दलजीत सिंग कॉन्सर्ट’ कार्यक्रमाला कोथरुडसह राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडून विरोध केला होता. रविवारी दुपारी याबाबत आंदोलन करण्यात आले होते. शिक्षक नगर, शिवतीर्थ नगर, कांचनबन सोसायटी, सीमा गार्डन, यासह अन्य सोसायट्यांना याचा त्रास होत असतानादेखील हा कार्यक्रम येथे घेण्यात येत आहे अशी तक्रार सोसायटीतील रहिवाशांनी केली होती. मात्र तरीदेखील हा कार्यक्रम पोलिसांच्या बंदोबस्तात रात्री झाला. रात्री साडेदहापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.
पुण्यामुंबईसह इतर राज्यातील प्रेक्षकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात प्रवेश केला आणि तेथील मद्यपान केलेल्या तरुण-तरुणींनी मद्यपान केल्याचे आरोप केले. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्याही ताब्यात घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी सातच्या सुमारास आंदोलन केेले. मात्र कार्यक्रम सुरूच राहिला.
कार्यक्रमात गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. आंदोलन झाल्यावरही आणि कोथरुडकरांचा, मंत्र्यांचा विरोध असतानाही पोलिसांकडून कार्यक्रम रद्द का केला गेला नाही आणि पोलिसांनी त्यांना संरक्षण देऊन कार्यक्रम होऊ का दिला असा प्रश्न संघटनेच्या कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संघटना अध्यक्ष विजय बाबर, शुभम माताळे, आशिष शिंदे, लखन सौदागर, अरविंद वालेकर, रोहिदास जोरी, प्रकाश नलावडे, मोहित बराटे, संतोष शर्मा, सुरज, गायकवाड लखन, तोंडे कृष्णा लिंगे, केदार सनस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.