धरणे यंदा १० टक्के अधिक भरली , जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

By Admin | Published: July 23, 2015 04:52 AM2015-07-23T04:52:47+5:302015-07-23T04:52:47+5:30

भोर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. लागवड झालेल्या भातासह

Dill recently filled 10 percent more, the rain increased in the district | धरणे यंदा १० टक्के अधिक भरली , जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

धरणे यंदा १० टक्के अधिक भरली , जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

googlenewsNext

भोर : भोर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. लागवड झालेल्या भातासह इतर पिकांनाही याचा फायदा होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, भाटघर धरण ४१ टक्के, तर नीरा देवघर धरण ३४ टक्के भरले आहे. जून महिन्यात सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणे या वेळी १० टक्के अधिक भरली आहेत.
मागील १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने भोर शहराजवळच्या व पूर्व भागातील भाताच्या लावण्या रखडल्या होत्या. मात्र, दोन दिवसांपासून संपूर्ण भोर तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. रखडलेली लागवड पुन्हा सुरु झाली आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी कामात व्यस्त असल्याने कामाला मजूर मिळत नाही.
दरम्यान, भाटघर धरणात मागच्या वर्षी २६ टक्के पाणीसाठा, तर नीरा देवघर धरणात २२ टक्के पाणीसाठा होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वेळी भाटघर धरणभागात आज ३० मिलिमीटर तर एकूण ३५६ मि.मी पाऊस झाला. धरण ४१ टक्के भरले आहे.
नीरा देवघर खोऱ्यात आज ६४ मि.मी तर एकूण ७८८ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरण ३४ टक्के भरले आहे. वीर धरण २२ टक्के भरले आहे.
पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर व भाटघर धरणभागातील डोंगरदऱ्यातून वाहणारे झरे व ओढे नाले बंद झाले होते. मात्र, पावसामुळे ओढेनाले पुन्हा भरून वाहू लागले आहेत. यामुळे या भागातील वरंधघाट परिसरात
पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
पौड : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे मुळशीत दमदार आगमन झाले आहे. मुळशी धरण परिसरात पावसाचा जोर आता चांगलाच वाढला आहे. मागील दोन दिवसांत या परिसरात २६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भातरोपे व भातलागवडीकरिता हा पाऊस योग्य असला तरी धरणांचा साठा वेगाने वाढण्याच्या दृष्टीने हा पाऊस अत्यल्पच आहे.
सध्या मुळशी व टेमघर धरणाच्या साठ्यात हळूहळू वाढ होत आहे. या भागातील धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी किमान एकूण ३००० मिमी पाऊस पडणे आवश्यक असतो. तहसील विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जून व जुलै अशा दोन महिन्यांतील पावसाची आतापर्यंतची मुळशी तालुक्याची एकूण सरासरी (१ जून ते २१ जुलै) १२२१ मि.मि. एवढी आहे.
(वार्ताहर)

Web Title: Dill recently filled 10 percent more, the rain increased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.