दिनेश बनला ‘कार की’च्या दुनियेचा जादूगार
By admin | Published: March 19, 2017 04:03 AM2017-03-19T04:03:34+5:302017-03-19T04:03:34+5:30
वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर शाळेतील हुशार विद्यार्थ्याने झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान अवगत करण्याचा छंद जोपासला. तो छंदच त्याच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे
- विलास भेगडे, तळेगाव दाभाडे
वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर शाळेतील हुशार विद्यार्थ्याने झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान अवगत करण्याचा छंद जोपासला. तो छंदच त्याच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे भक्कम साधन झाले आहे. मात्र, आपल्या कलेचा उपयोग सामाजिक सेवेसाठीही व्हावा म्हणून सीबीआय, महाराष्ट्र पोलीस आणि अडल्या-नडलेल्यांच्या मदतीसाठी दिनेश कोतूळकर हा कॉम्प्युटराइज्ड लॉक-अनलॉक कार की टेक्निशियन आनंदाने धावून जात असतो.
‘कार की’मधील चावीच्या दुनियेचा जादूगर अशी दिनेशची ओळख झाली आहे. जगातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यात तो आघाडीवर आहे. कारचोरीला आळा घालण्यासाठी गेल्या १० वर्षांत उत्तमोत्तम संशोधन इटली, जर्मनी आणि जपान देशात झाले. भारतातही परदेशी बनावटीच्या कार सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाल्या. परंतु गेल्या पाच वर्षांत इलेक्ट्रॉनिक कार की सिस्टीमचा बोलबाला झाला, तसे कारचोरीचे प्रमाण ९९ टक्के रोखले गेले. एक टक्क्यापेक्षाही कमी ते राहिले. असे असले तरी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चाव्या हरविण्याची सवय भारतात सर्वांत जास्त आढळते, असे सांगून दिनेश म्हणाला की, चावीचा वापर व्यवस्थित न करणे. गाडीतच चावी विसरून दार बंद करणे. चावी कोठेही ठेवणे अशा सवयीमुळे कारचालक व मालक त्रस्त होतात. अनेकांना चावी हरविल्याने कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते.
दिनेश म्हणाला, ‘‘इलेक्ट्रॉनिक सिस्टीम अत्यंत सुरक्षित व गुंतागुंतीची असल्याने कार मॅन्युअली सुरू करणे शक्य नाही. संगणकीय प्रणालीवर संरक्षित केलेला कोड आणि स्कॅनिंग व मॅचिंगनंतरच नवीन कार की तयार करता येते. हे सारे इंग्रजीत असले, तरी कुलुप-चावीचे मूळ तंत्रज्ञान मी आत्मसात केल्याने व नंतर इंटरनेटवरून माहिती घेऊन त्यात अपडेट राहिल्याने हे काम करणे माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. त्यासाठी मी लंडन, इटलीतून मशिन आणली आहेत.’’
सीबीआय किंवा पोलिसांना गुन्हे तपासाच्या कामी दार किंवा अन्य कुलपे उघडून देण्यासाठी मी मोफत सेवा दिली आहे. या व्यवसायात मोठी रिस्क आहे. अनोळखी व्यक्तीकडून गाडी किंवा घराची कागदपत्रे पाहून आणि त्याची सत्यप्रतीची खातरजमा करूनच ही सेवा देण्याचा कटाक्ष मी पाळला आहे. चावीचा व्यवसाय हा प्रतिष्ठेचा म्हणून कोणी पाहत नसले, तरी मी माझ्या कारागिरीच्या जोरावर ती प्रतिष्ठा मिळविली.
अपरात्रीही मदतीसाठी धाव
स्थानिक लोकांच्या मदतीसाठी मला रात्री-अपरात्री कधीही फोन आला, तर जावे लागते. कोणाचे मूल बेडरूम, बाथरूमचे लॅच लॉक झाल्याने अडकून पडते. चाव्या घरातच आणि बाहेरून ओढून घेतल्याने आॅटोमॅटिक लॅच लागल्याने अडचण होते. किचनमध्ये गॅस चालू असताना लॅच लागल्याने कठीण प्रसंग उद्भवतात. अशा विसरभोळ्या मंडळींना दिलासा देण्याचे काम मी करतो.