डेक्कन क्वीनची प्रशस्त डायनिंग कार सज्ज; लवकरच सेवेत दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 03:08 PM2020-01-08T15:08:15+5:302020-01-08T15:11:43+5:30
पुणे-मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही डायनिंग कार विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ..
पुणे : भारतीय रेल्वेसाठी प्रतिष्ठेची असलेल्या डेक्कन क्वीनला नवी झळाळी मिळणार आहे. प्रवाशांसाठी आकर्षण असलेल्या डायनिंग कारचा चेहरामोहराही बदलण्यात येणार आहे. एकाचवेळी ४० प्रवासी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील, अशी प्रशस्त कार सज्ज झाली आहे. पुढील काही दिवसांत ही कार प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
देशभरात नियमितपणे धावणाऱ्या प्रवासीरेल्वेगाड्यांमध्ये डेक्कन क्वीनची पॅन्ट्रीसह असलेली डायनिंग कार एकमेव आहे. जून महिन्यातच या गाडीला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. रेल्वेच्या शिरपेचातील मानाचा तुरा असलेल्या डेक्कन क्वीनला प्रवाशांची नेहमीच पसंती असते. पुणे-मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही डायनिंग कार विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. काही तांत्रिक कारणास्तव मध्य रेल्वेने २०१५ मध्ये डायनिंग कार काढली होती. त्याला प्रवाशांनी जोरदार विरोध केला. या विरोधानंतर काही महिन्यांनी पुन्हा डायनिंग कार जोडण्यात आली. रेल्वेकडून लांबपल्ल्याच्या गाड्यांचे पारंपरिक डबे बदलून लिंके-हाफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडले जात आहेत. अनेक गाड्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. आता डेक्कन क्वीनलाही एलएचबी कोच मिळणार आहेत. त्याअंतर्गतच डायनिंग कारचे रुपडेही बदलण्यात येणार आहे.
रिसर्च, डिझाईन, अॅन्ड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन (आरडीएसओ) या रचनेला मान्यता दिली आहे. दरम्यान, एलएचबी कोचमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. गाडी सुरू होण्याच्या किंवा थांबण्याच्या वेळी झटके बसणार नाहीत. डब्यांमध्ये सुविधाही आधुनिक असून गाडीचा वेगही ताशी १६० ते २०० किलोमीटरपर्यंत असणार आहे. पुढील काही दिवसांत रेल्वे प्रवाशांच्या सेवेत ही गाडी दाखल होणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
.......
च्नवीन डायनिंग कारमध्ये एकावेळी ४० प्रवासी बसू शकतात. सध्या मर्यादित जागा असल्याने अनेक प्रवाशांना वाट पाहत बसावे लागते.
च्नव्या कारच्या खिडक्याही मोठ्या आकारातील असल्याने निसर्गसौंदर्याचा आनंद घेत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.
च्प्रवाशांना नवनवीन खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचीही रेल्वेची योजना आहे.