जुन्नरच्या मुथाळणे गावात भीषण परिस्थिती; आदिवासी बांधव गढूळ पाणी पितायेत गाळून, १५ दिवसात पाण्याचा टँकरच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:31 PM2022-05-05T13:31:02+5:302022-05-05T18:11:58+5:30
आदिवासी माता भगिनींचा जीव आता पाणी मिळविण्यासाठी मेटाकुटीला आला
अशोक खरात
खोडद : जुन्नर तालुक्यातील मुथाळणे गावच्या गावठाणवाडीत मागील १५ दिवसांपासून पाण्याचा टॅंकर आला नाही. यामुळे या आदिवासी माता भगिनींचा जीव आता पाणी मिळविण्यासाठी मेटाकुटीला आला आहे. खडकाच्या झिऱ्यातून येणारे थेंब थेंब पाणी वाटी वाटीने भरून घ्यायचे आणि हंडा भरायचा अशी कसरत या महिलांना करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी या ग्रामस्थांना रात्रभर ताटकळत राहावे लागत आहे.
या गावठाणवाडीत सुमारे १५ दिवसांपूर्वी पाण्याचा टॅंकर आला होता पण त्यानंतर पुन्हा आजपर्यंत टॅंकर आला नसल्याने येथील आदिवासी बांधवांचे अतोनात हाल झाले आहेत. या आदिवासी बांधवांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न आता व्यक्त केला जात आहे.
या गावठाणवाडी मध्ये सुमारे ३५ कुटुंब वास्तव्य करत आहेत. पाणी मिळविण्यासाठी खडकातून येणाऱ्या झिऱ्याचा वापर केला जातो. राहत्या घरापासून सुमारे एक किलोमीटर भर पायपीट करून या ठिकाणी येऊन वाटी वाटी भरून पाणी घेतले जाते. हे पाणी मिळविण्यासाठी पहाटे ३ वा.नंबर लावले जातात तर काही जण रात्रभर या ठिकाणी झोपायलाच येतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पाण्यासाठी नंबर लावायचा आणि जवळच शेकोटी करून तिथेच झोपायचं आणि नंबर आला की पाणी मिळवायचं असा हा या ग्रामस्थांचा जणू दिनक्रमच झाला आहे. पहाटे ३ वा.जर पाणी भरण्यासाठी नंबर लावल्यानंतर दुपारी २ ते अडीचच्या दरम्यान नंबर येतो अशी परिस्थिती आहे. कधी कधी पाण्यासाठी लावलेल्या नंबर वरून महिलांची भांडणं देखील होतात.
मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी
मुथाळणे , कोपरे , मांडवे , जोशीची वाडी , पुताची वाडी या परिसरातील तरुण मुलं नोकरीनिमित्त पुणे , मुंबई ,नाशिक यासारख्या ठिकाणी बाहेर गावी स्थायिक आहेत. घरी वयोवृद्ध आई वडील असतात. त्यांना विशेषतः पाण्यासाठी या उतरत्या वयात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ज्या वयात आराम करण्याची गरज आहे. त्या वयात पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष म्हणजे खेदजनक आणि दुर्दैवी आहे.
पाण्यासाठी संघर्ष अत्यंत खेदजनक बाब
या भागात दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवते पण या समस्येवर शाश्वत उपाययोजना न करता पाण्याचा टॅंकर देऊन तात्पुरत्या स्वरूपात ही समस्या सोडवली जाते.मागील अनेक वर्षांपासून म्हन्हे अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून या भागातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागत आहे ही खेदजनक बाब आहे.
गढूळ व शेवाळ आलेलं पाणी गाळून पितात
पाणी ही मूलभूत गरज व हक्क आहे, तरी देखील जुन्नर तालुक्यातील या दुर्गम भागातील अनेक आदिवासी बांधवांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. एकीकडे आपण फिल्टर आणि बाटली मधलं पाणी पितो आणि एकीकडे हे लोक गढूळ व शेवाळ आलेलं पाणी गाळून पितात , हा विरोधाभास आणखी किती दिवस पाहायला मिळणार आहे ? हा मन विषण्ण करणारा प्रश्न आहे.