बारामतीतील घरफोडीचे थेट विदर्भ कनेक्शन; महाराष्ट्र, कर्नाटकातील १९ गुन्हे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 07:16 PM2021-02-23T19:16:18+5:302021-02-23T19:16:53+5:30
महाराष्ट्रासह कर्नाटकातील १९ गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बारामती: सांगवी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा शोध घेण्यात पुणे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. घरफोडी प्रकरणी नागपूर शहरातुन दाम्पत्याला सापळा रचून अटक केली. या दाम्पत्याने राज्यासह कर्नाटकात धुमाकूळ घातल्याचे पोलीस तपासात उघड झाली आहे. तब्बल १९ गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी नवनीत मधुकर नाईक (वय ४०) व प्रिया नवनीत नाईक (वय ३६, रा. विजय निवास, रेडीस चाळ, शिवाजीनगर, भांडूप पश्चिम मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सांगवीमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी २ डिसेंबर रोजी राहुल सदाशिव तावरे यांनी याबाबत फिर्याद दिली होती
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथे झालेल्या घरफोडीत ३ लाख ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. त्यानंतर तातडीने या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या पथकाने सुरु केला होता.पोलीस तपासात या गुन्ह्यातील आरोपी नागपूर येथे भाडोत्री राहत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांनी सांगवीतील गुन्ह्याची कबुली दिली.
या पती-पत्नी विरोधात राज्यासह कर्नाटकात तब्बल १९ चोरीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. भोर, लोणावळा, कोपरगाव (नगर), पोयनाड (रायगड), मोरा सागरी (नवी मुंबई), लोणंद, बडनेरा(अमरावती), पेठवडगाव (कोल्हापूर), शहापूर (ठाणे), रत्नागिरी, छावणी (नाशिक), कारंजा (वाशिम), मिरज (सांगली), सदर बझार (जालना), वाशी (नवी मुंबई), रबाळे (नवी मुंबई), के. आर. पूरम (बेंगलोर) या ठिकाणी १९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनवट यांच्यासह उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, कर्मचारी दत्तात्रय गिरीमकर, रविराज कोकरे, अनिल काळे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, ज्योती बांबळे, महमंद मोमीन, विजय कांचन, अजित भुजबळ, अभिजित एकशिंगे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, डी. बी. डमरे यांनी घरफोडी करणाºया दांपत्याला गजाआड करण्यात महत्वाची भूमिका बजावली.