आंदोलनाची दिशा आज ठरणार
By admin | Published: February 22, 2015 12:32 AM2015-02-22T00:32:35+5:302015-02-22T00:32:35+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर बेमुदत उपोषण सुरू आहे.
पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलन तीव्र करण्याबाबत रविवारी (दि. २२) भूमिका ठरविण्यासंदर्भात शहरातील पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, उपोषणाला बसलेल्या तरुणांची शनिवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये अश्विनी सातव-डोके व हर्षल लोहकरे या दोघांची प्रकृती खालावल्याचे आढळले आहे. ‘किटोन'चे प्रमाण वाढल्याने उपोषणाचा कालावधी वाढल्यास या दोघांची किडनी निकामी होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दि. १६ फेब्रुवारीला कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला होता. पाच दिवस मृत्यूशी झुंज देत शुक्रवारी पानसरे यांचे निधन झाले. १७ फेब्रुवारीपासून राजन दांडेकर, हनुमंत पवार, अश्विनी सातव-डोके व हर्षल लोहकरे यांनी उपोषण सुरू केले आहे. पानसरे व दाभोलकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करावी, तसेच हल्ल्यामागील शक्तींचा शोध घ्यावा, या मागण्यांसाठी पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
या उपोषणाला शहरातून प्रतिसाद मिळत आहे. विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करावी. तसेच दोन्ही घटनांतील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांना तातडीने पकडावे, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी, मारेकऱ्यांसह यामागे असणारा मास्टर माइंडचा शोध घ्यावा. ज्या प्रतिगामी शक्ती यामागे असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, आदी मागण्या या पत्रातून करण्यात येणार आहेत. या संदर्भात आंदोलकांसह कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविणार आहेत.
पालकमंत्र्यांची धावती भेट
पाच दिवस पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू आहे. या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच उपोषणकर्त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
आंदोलनाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठा आहे. तरुण कार्यकर्ते पथनाट्य, क्रांतिकारी गीते यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून आंदोलन करताना दहा हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते. पानसरे अण्णांच्या हत्येबद्दल प्रचंड संताप आहे. आज दिवसभर आम्ही याबद्दल मौन बाळगले होते.
- राजन दांडेकर, उपोषणकर्ते
फडणवीस सरकारने पानसरे यांच्या निधनानंतर दुखवट्याचा साधा प्रोटोकॉलही पाळला नाही. यावरूनच सरकारची फॅसिस्ट वृत्ती दिसून येत आहे. पानसरे यांचे खुनी सनातनी विचारांचे आहेत. त्यांच्या निषेधासाठी तरुणाई जागी होत आहे. - हणमंत पवार, उपोषणकर्ते