रविवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरणार : मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 07:48 PM2023-10-21T19:48:29+5:302023-10-21T20:01:40+5:30
आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा एक ही डाव आत्तापर्यंत आपण यशस्वी होऊ दिला नाही....
- शैलेश काटे
इंदापूर (पुणे) : रविवारी (दि. २२) बैठक घेऊन मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आजवरच्या शांततेच्या युध्दानेच सरकार जेरीस आलेले आहे. त्यामुळे उग्र आंदोलन करु नका. आरक्षणासाठी आत्महत्या करु नका. मंडळनिहाय गावात जावून जागृती करा, असे आवाहन मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. २१) प्रशासकीय भवनाशेजारच्या पटांगणात झालेल्या विराट सभेत केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते.
ते म्हणाले की, आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी सरकारच्या आवाहननुसार आपण त्याला एक महिना व जास्तीचे दहा दिवस दिले. येत्या २४ तारखेला त्यास ४० दिवस पूर्ण होत आहेत. आरक्षणाचा घास हातातोंडाशी आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एका ही मराठ्याच्या पोराने आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर पोरे मरायला लागली तर आरक्षण द्यायचे कुणाला अन् आंदोलन करुन त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला.
आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा एक ही डाव आत्तापर्यंत आपण यशस्वी होऊ दिला नाही. पुढेही होऊ द्यायचा नाही म्हणून आता त्यांचे नाव घ्यायचे नाही, असे ते म्हणाले. आता त्यांनी बहुतेक आपलेच लोक आपल्या विरोधात उठवायचे ठरवले आहे. तो ही त्यांचा डाव आपण हाणून पाडायचा आहे. त्यासाठी २४ तारखेपर्यंत शांत रहायचे आहे. कोणाच्या टीकेला उत्तर द्यायचे नाही. कोणाचे नाव घ्यायचे नाही. २४ तारखेनंतर मात्र त्यांची गाठ मराठ्यांशी आहे. मग बघू कोण कोण येते ते अशा शब्दात त्यांनी आरक्षणविरोधकांना आव्हान दिले. प्रास्ताविक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण पवार यांनी केले.
महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजावरच हल्ला -
अंतरवाली सराटी या ठिकाणच्या आंदोलनाच्या वेळी आंदोलकांवर हल्ला झाल्यानंतर जरांगे पाटील अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द झाले. त्या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा अजूनही ओल्या असल्याचे त्यांच्या भाषणात प्रकर्षाने जाणवले. त्यांनी आपल्या भाषणात त्यावेळेसचा प्रसंग संथ व ठाशीव पध्दतीने सांगितला. ते म्हणाले की, हा हल्ला केवळ अंतरवालीवर नव्हता, तो महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजावरचा हल्ला होता. आम्हाला तर रक्तबंबाळ केले. आमच्या आयाबहिणींचे डोके फोडले. चार महिन्याचे लेकरु मांडीवर असणा-या भगिनीच्या डोक्यात काठ्या मारल्या. बत्तीस टाके पडले. रक्त त्या लेकराच्या अंगावर पडत होते. त्या किंकाळ्या ऐकण्यासारख्या नव्हत्या. आम्ही काही पाप केले नव्हते. लोकशाहीच्या व कायद्याने केलेल्या नियमाच्या आधीन राहून ते आंदोलन सुरु होते. आमरण उपोषणासारखे इतक्या शांततेत असणारे आंदोलन देशात झालेले नाही,तरी ही सरकारने तो हल्ला घडवून आणला. मात्र आम्ही डगमगलो नाही. आज ही शांततेत ते आंदोलन सुरु आहे. आता तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसतच नाही. कारण आमच्या संयमाचा विचार सरकारला करावा लागेल. आम्ही हटणारातले मराठे नाही. मराठ्यांनी अफगाणिस्तानापर्यंत झेंडे लावले आहेत. तुमचा तर उलटासुलटाच कार्यक्रम करतील, असे सांगून आता तरी शुध्दीवर या, असा सल्ला जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.