डॉक्टर साधणार रुग्णांशी थेट संवाद
By admin | Published: October 19, 2015 02:05 AM2015-10-19T02:05:18+5:302015-10-19T02:05:18+5:30
रुग्णालयातील डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे यांचा आढावा घेण्यासाठी इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीनच्या
पुणे : रुग्णालयातील डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे यांचा आढावा घेण्यासाठी इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीनच्या (आयएससीसीएम) डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी सर्व रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात काम करणारे डॉक्टर मीट युवर डॉक्टर या कार्यक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व रुग्णालयांत टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबणार असल्याची माहिती डॉ. शिरीष प्रयाग यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
नुकत्याच पूना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात सुसंवाद नसल्याने अशा प्रकारच्या घटनांना डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे. या गोष्टीचा केवळ निषेध नोंदवून थांबता येणार नाही. तर या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कशा प्रकारे काम केले जाते, याबाबत माहिती मिळावी यासाठी थेट विशेष संवादाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे डॉ. कपिल झिरपे यांनी सांगितले.
अतिदक्षता विभागात रुग्णांवर उपचारादरम्यान डॉक्टरांना कराव्या लागणाऱ्या कामांची अधिक सखोल माहिती मिळावी यासाठी लघुपट तयार केला आहे. त्याचेही प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच संवादासाठी मराठी ब्लॉग सुरू होणार आहे. डॉक्टर आणि रुग्णांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी पारदर्शकता येण्यासाठी हा उपक्रम लाभदायक ठरेल, असा विश्वास उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केला. या वेळी डॉ. बी. डी. बांडे व डॉ. अजित यादव व डॉ. शुभल दीक्षित उपस्थित होते.