Pune | कोट्यावधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष

By विवेक भुसे | Published: March 25, 2023 12:12 PM2023-03-25T12:12:42+5:302023-03-25T12:15:50+5:30

प्रभात रोडवरील कार्यालय केले बंद...

Director absconded to Dubai after stealing crores of rupees; Lure of high return on investment | Pune | कोट्यावधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष

Pune | कोट्यावधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष

googlenewsNext

पुणे : गुंतवणुकीवर दरमहा ५ ते ६ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडून कोट्यावधींना गंडा घालून प्रभात रोडवरील कार्यालय बंद करुन संचालक दुबईला पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडे आतापर्यंत दोघा व्यावसायिकांच्या तक्रारी आल्या असून त्यांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. आणखी लोकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता असल्याचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर यांनी सांगितले.

याप्रकरणी शिवणे येथील एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत रमेश पाटील (वय २५, रा. मोराळे(राजापूर), पलूस, सांगली), संतोषकुमार विष्णु गायकवाड (रा. बलवडी़ ता. खानापूर, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार प्रभात रोडवरील कार्यालयात २० ते २७ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय व इंडस्ट्री आहे. पतीची व्यावसायिक स्थिती चांगली असल्याचे पाहून संतोषकुमार गायकवाड याने त्यांच्याशी मैत्री केली. आपला फॉरेक्स, ट्रेडिंग व क्रिप्टो करन्सीचा व्यवसाय असून बेस्ट पॉईट इम्पॅक्ट जनरल ट्रेडिंग नावाने कंपनी असल्याचे सांगितले. कंपनीचे प्रभात रोडवर कार्यालय असल्याचे सांगितले. इतर लोकांना दरमहा ५ ते ६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याचे त्याने दाखविल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला १ कोटी रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर २४  ऑगस्ट २०२१ ला ८० लाख रुपये रोख दिले.

संतोषकुमार गायकवाड याने समजुतीचा करारनामा करुन दिला. मार्च २०२२ मध्ये तुम्हाला देण्यात येणार्‍या नफ्याच्या रक्कमेचा आपण संपूर्ण हिशेब करुन ती ६ टक्के दराने येणारी रक्कम तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही आणखी दुसरी गुंतवणूक सुरु करा म्हणजे मार्च महिन्यात तुमचा आणखी फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर तो दुबईला गेला. मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात संतोषकुमार गायकवाड पुण्यात आला. त्याने फिर्यादी यांच्या परताव्याच्या रक्कमेचा हिशेब करुन तुम्हाला अंदाजे ५० लाख रुपये मिळणार असे सांगितले. त्यानंतर आणखी २० लाख रुपये द्या म्हणजे तुमची गुंतवणूक अडीच कोटी रुपये होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी आणखी २० लाख रुपये रोख प्रभात रोडच्या कार्यालयात नेऊन दिले.

त्यानंतर तो अचानक दुबईला निघून गेला. फिर्यादीच्या पतीने अनेकदा फोन केले. तेव्हा त्याने पुण्यात परत आलो की देतो, असे सांगून त्यांना झुलवत ठेवले. त्यानंतर त्याने प्रभात रोडवरील कार्यालय सुद्धा बंद केले. नंतर त्यांचे फोनही घेणे बंद केले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फियार्दी यांनी तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची २ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून आणखी एका व्यावसायिकाची ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली आहे. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर तपास करीत आहेत.

Web Title: Director absconded to Dubai after stealing crores of rupees; Lure of high return on investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.