प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:20 AM2021-04-19T08:20:12+5:302021-04-19T09:15:40+5:30
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड; गेल्या १० दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरू होते उपचार
पुणे: ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १० दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय नितळ, अस्तु देवराई यासारखे अनेक आशयघन चित्रपट त्यानं दिग्दर्शित केले आहेत.
सुमित्रा भावे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक, सामाजिक विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. चौकटीबाहेरचा विचार करून, चाकोरी मोडून चित्रपटाची निर्मिती करणारी दिग्दर्शिका हरपल्याची भावना भावे यांच्या निधनामुळे व्यक्त होत आहे.
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, कासव, अस्तु असे उत्तम चित्रपट त्यांनी तयार केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांच्या चित्रपटांचं कौतुक झालं. अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. भावे यांनी त्यांच्या चित्रपटांमधून अनेक सामाजिक प्रश्न हाताळले.
सुमित्रा भावे यांनी टाटा इन्स्टीट्यूटमधून समाज विज्ञान विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर १० वर्ष त्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिकवत होत्या. १९८५ मध्ये स्त्रीवाणीसाठी त्यांनी पहिली शॅार्ट फिल्म केली. बाई नावाच्या फिल्म मधून त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला होता. या फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये दोघी हा सिनेमा दिग्दर्शित केला. वास्तुपुरुष, घो मला असा हवा, हा भारत माझा, संहिता असे अनेक सिनेमे दिग्दर्शित केले होते.
लेखिक-दिग्दर्शिका-सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भावे यांचं आज सकाळी सव्वासात वाजता पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात निधन झालं.
गेले दोन महिने त्या फुफ्फुसांच्या विकाराने त्रस्त होत्या. सध्याची कोविडची परिस्थिती बघता व एरवीही अशा प्रसंगी गर्दी असू नये हे सुमित्रा भावे यांचं मत लक्षात घेता, थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
- चिन्मय दामले