‘सिम्बायोसिस’चे संचालक सक्तीच्या रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 01:37 AM2018-10-21T01:37:27+5:302018-10-21T01:37:42+5:30
सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही.
पुणे : सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. जवळपास शंभरहून अधिक आजी-माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे संचालक अनुपम सिद्धार्थ यांना पदावरून हटवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने याची चौकशी सुरू केली असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मीटू’ चळवळीच्या माध्यमातून संस्थेतील जवळपास दहा विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषण, तसेच गैरवर्तनाचा प्रकार समोर आणला होता. त्यानतंर विद्यापीठाने अंतर्गत चौकशी समिती नेमून त्याबाबत चौकशीही सुरू केली. पण गैरवर्तन, तसेच मानसिक छळाला सामोरे जावे लागलेल्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आता उघडपणे याबाबतची तक्रार केली आहे. सुमारे १०० हून अधिक विद्यार्थिनींनी संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासन विभागाचे अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी यांच्याकडे अनुपम सिद्धार्थ यांच्याविषयी ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. संस्थेच्या बंगळुरू येथील आवारातील एक लैंगिक शोषणाचा प्रकारही दडपल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. शनिवारी दिवसभर विद्यापीठ अंतर्गत चौकशी समितीसमोर अनुपम सिद्धार्थ यांची चौकशी सुरू होती.
विद्यार्थिनींच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यावरच विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीकडून शनिवारी अनुपम सिद्धार्थ यांच्यावरील तक्रारींची चौकशी सुरू होती. या समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार कुलगुरूंनी त्यांना सखोल चौकशी होईपर्यंत रजेवर पाठविले आहे.
- डॉ. विद्या येरवडेकर,
प्रधान संचालिका, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ