अपंगत्वाचाही मांडलाय धंदा! शासकीय फायदे मिळविण्यासाठी प्रमाणपत्रावर वाढविली जातेय टक्केवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 11:48 AM2022-05-07T11:48:16+5:302022-05-07T11:49:23+5:30
१४-१५ टक्के अपंगत्व असूनही प्रमाणपत्रावर पन्नास टक्के दाखविण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण...
पुणे : शासकीय फायदे मिळविण्यासाठी अपंगत्वाची टक्केवारी वाढवून देण्याचा धंदाच मांडला गेला आहे. १४-१५ टक्के अपंगत्व असूनही प्रमाणपत्रावर पन्नास टक्के दाखविण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण होत आहे. यानिमित्ताने पैसे खाण्याचे नवे कुरणच खुले झाले आहे.
अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी करून देण्यात येणाऱ्या अपंग प्रमाणपत्रामध्ये परस्पर फेरबदल करून रेफरल शिट अपलोड केली जात नसल्याचे दिसून आले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात आर्थिक हितसंबंध लक्षात घेऊन दिव्यांगांना खोटे प्रमाणपत्र वाटप केले जात असल्याचा आरोप करत प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेने वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे केला आहे. सपंग व्यक्तींना खोटे दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केल्याने खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने त्यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अस्थिव्यंगोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांगांची टक्केवारी कमी नमूद केलेली असताना तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी परस्पर फेरफार करून दिव्यांगांची आकडेवारी वाढवून खोटी प्रमाणपत्रे वितरित केली आहेत. याबाबत प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्याविरोधात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसून, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
आंदोलनाच्या लेखी तक्रारीची दखल घेऊन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या उपायुक्तांनी याबाबत प्रधान सचिवांना पत्र लिहिले आहे. अशा प्रकरणातील संबंधितांची चौकशी करून दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याबाबतचा अहवाल आयुक्तालयास १० दिवसांच्या आत सादर करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. अपंग व्यक्तींना न्याय मिळावा, यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे.