दिव्यांग निवृत्तांना नको हयातीच्या दाखल्याने टेन्शन; बँक अधिकारी येतील घरी, जास्त वय असलेल्यांनाही सवलत
By राजू इनामदार | Published: November 20, 2023 03:49 PM2023-11-20T15:49:36+5:302023-11-20T15:50:00+5:30
बँकेचे अधिकारीच त्यांच्या घरी येऊन ते हयात असल्याची खात्री पटवतील व त्यांचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा करतील, न्यायालयाकडून बँकाना तसा आदेश
पुणे: निवृत्त वेतन मिळते, मात्र त्यासाठी हयातीचा दाखला बँकेत सादर करावा लागतो. ३० नोव्हेंबर ही यासाठीची अंतीम मुदत आहे. दिव्यांग असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मात्र याचा त्रास होणार नाही. बँकेचे अधिकारीच त्यांच्या घरी येऊन ते हयात असल्याची खात्री पटवतील व त्यांचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा करतील. न्यायालयाने बँकाना तसा आदेश दिला आहे.
दाखला म्हणजे केवळ स्वत: स्वाक्षरी करणे
निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी त्यांचे वेतन जमा होत असलेल्या बँकेत जाऊन आपण हयात असल्याचे सिद्ध करावे लागते. हयातीचा दाखला म्हणजे वेगळा दाखला वगैरे काही नसून बँक देत असलेल्या एका प्रतिज्ञापत्रकावर स्वत: जाऊन स्वाक्षरी करावी लागते. अनेक निवृत्तीवेतन धारकांना हे करणे वय किंवा दिव्यांग असल्याने, एकटे रहात असल्याने, कोणी बँकेत घेऊन जायला नसल्यानेअडचणीचे होते. त्यांच्यासाठी आता न्यायालयाच्या आदेशाने दिलासा मिळाला आहे. दिव्यांग किंवा वयोवृद्ध निवृत्तीवेतन धारकाच्या घरी जाऊन बँक कर्मचाऱ्यांनीच ते हयात असल्याची स्वाक्षरी त्यांच्याकडून घ्यावी असा आदेश बँकांना दिला आहे.
खरी अडचण ही
केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, महापालिका यामधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतनाचे नियम वेगवेगळे आहेत ही खरी सेवानिवृत्तांची अडचण आहे. काही बँका केवायसी ( संपूर्ण परिचय) मागतात. काही बँका प्रत्यक्ष कर्मचाऱ्याने बँकेत यायलाच हवे असा आग्रह धरतात. काही बँक दरमहा संबधित कर्मचाऱ्याने बँकेत यायलाच हवे असे सांगतात. ही छळवणूक आहे असे निवृत्तीवेतनाधारकांचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे आता किमान दिव्यांग व वयोवृद्ध निवृत्तीवेतनाधारकांना थोडा तरी दिलासा मिळेल असे निवृत्तीवेतनधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
न्यायालय आदेशाची अंमलबजावणी कधीपासून
निवृत्तीवेतनधारकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. कामाच्या स्वरूपानुसार या संघटना तयार झाल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, महापालिका अशीही विभागणी त्यांच्यात आहे. सगळे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, सगळेच निवृत्तीवेतन घेतात तर त्यासाठीचे नियम वेगवेगळे कशासाठी करता, तेही सर्वांसाठी सारखेच हवेत असे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातही हयात आहोत असे स्वत:च सिद्ध करणेही त्यांच्यासाठी त्रासदायक आहे. फक्त त्यासाठी म्हणून अनेकांना बँकेत जाता येत नाही अशी त्यांची तक्रार होती, त्यावर उपाय निघाला मात्र त्याची अमलबजावणी कधीपासून होणार असा त्यांचा प्रश्न आहे.
कोणत्याही निवृत्तीवेतनधारकाने हयातीच्या दाखल्याचे टेन्शन घेऊ नये. संबधित निवृत्तीवेतनधारक हयात आहे, निवृत्तीवेतन त्याच्याच खात्यात जमा होणार आहे याची बँकेला हमी हवी असते. ती पटवून देणे म्हणजेच बँकेत जाऊन फक्त त्यांच्यासमोर स्वाक्षरी करणे इतकेच आहे. न्यायालयाच्या आदेशाची त्वरीत यावर्षीपासूनच अमलजावणी करावी अशी आमची मागणी आहे.- अजित गोखले- सेवानिवृत्त बँक अधिकारी