घराच्या ७५ पायऱ्या हाताने चढत दिव्यांग रफिक खान यांनी फडकविला तिरंगा; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 09:11 PM2022-08-13T21:11:05+5:302022-08-13T21:14:07+5:30
रफिक खान यांच्या या प्रयत्नाचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांकडून कौतुक
पुणे : घराच्या ७५ पायऱ्या हाताने चढत टेरेस गाठले. तिथे जमिनीपासून बरोबर ७५ फुटांवर त्यांनी तिरंगा फडकावला. दोन्ही पायांनी १०० टक्के दिव्यांग असलेल्या रफिक खान यांच्या या प्रयत्नाला कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा मोहिमेला प्रतिसाद म्हणून रफिक खान यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात स्वत:च्याच घरावर तिरंगा फडकावण्याचा संकल्प केला हाेता. त्यानुसार त्यांनी उपक्रम यशस्वीपणे राबविलाही. ते प्रत्येक मजल्याचा जिना चढून वर आले की जमलेले लोक टाळ्या वाजवत. असे करीत ते वर गेले आणि खास खुर्चीवर बसून तिरंगा फडकावला व त्याला सॅल्युट केला.
रफिक खान हे सामाजिक कार्यकर्ते असून, सरकारी दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीचे सदस्य आहेत. प्रहार दिव्यांग संघटनेत ते काम करतात. पॅरा टार्गेट शुटिंग संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. देशातील सर्व विमानतळांवर १०० फूट उंचीचा तिरंगा अधिकृतपणे फडकविण्यात यावा, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.
दिव्यांग रफिक खान घराच्या ७५ पायऱ्या चढत फडकविला तिरंगा#pune#IndependenceDay2022pic.twitter.com/KucnLg6QDR
— Lokmat (@lokmat) August 13, 2022