वैद्यकीय सेवा बंद राहिल्याने गैरसोय
By admin | Published: March 24, 2017 04:28 AM2017-03-24T04:28:45+5:302017-03-24T04:28:45+5:30
डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ ससूनमधील निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा निर्णय कायम राहिला. इंडियन मेडिकल
पुणे : डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ ससूनमधील निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा निर्णय कायम राहिला. इंडियन मेडिकल असोसिएशनने निवासी डॉक्टरांना दिलेल्या पाठिंब्यामुळे शहरातील वैद्यकीय सेवा बंद राहिल्याने रुग्णांची गैरसोय झाली. डॉक्टरांनी बंदमध्ये सहभागी होत असताना अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहिल्या. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये काळ्या फिती लावून काम करण्यात आले.
ससूनमधील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासनातर्फे त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानंतरही डॉक्टरांनी संपाचा निर्णय रात्री उशिरापर्यंत कायम ठेवला होता. शासनस्तरावरून सुरक्षाव्यवस्था वाढविण्यासह अलार्म यंत्रणा, पास सिस्टीम असे विविध आदेश गिरीश महाजन यांनी दिल्यानंतरही त्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने, रजा सुरूच ठेवणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, डॉक्टरांच्या काम बंदच्या निर्णयामुळे रुग्णांचे अतोनात हाल झाले. अनेक रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नसल्याने रुग्णांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे जास्त हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक रुग्णालयांमध्ये
केवळ ओपीडी बंद ठेवण्यात
आले होते, तर काही रुग्णालयांमध्ये केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया
करण्यात आल्या. मोजक्या
लोकांच्या चुकीमुळे डॉक्टर सर्वच निर्दोष सामान्य रुग्णांना वेठीस धरत असल्याची प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात आली.
(प्रतिनिधी)