अर्धवट काँक्रीट रस्त्यामुळे गैरसोय
By Admin | Published: October 12, 2016 02:51 AM2016-10-12T02:51:20+5:302016-10-12T02:51:20+5:30
राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यानच्या डीपी रस्त्यावर कांक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत थांबले असल्याने दीर्घ काळापासून काही भागात रस्ता अरुंद
पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यानच्या डीपी रस्त्यावर कांक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत थांबले असल्याने दीर्घ काळापासून काही भागात रस्ता अरुंद बनला असून, तो धोकादायक झाला आहे.
या डीपी रस्त्याला श्रीकांत मंत्री असे नाव देण्यात आले आहे. राजाराम पुलाकडील भागापासून या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, रस्ता योग्य प्रमाणात खोदाई न करता वरच्या स्तरात काँक्रीट पसरून हे काम केले जात होते. त्यातच स्थानिक नागरिकांनी रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे पाणी सोसायट्यांमध्ये व घरांमध्ये घुसण्याची शक्यता असल्याने विरोध दर्शविला होता.
अखेर रस्त्याच्या डाव्या बाजूचे काँक्रिटीकरण काही मीटर पूर्ण झाल्यानंतर हे काम अर्धवट सोडण्यात आले. त्यामुळे रस्त्याचा काही भाग फूट ते दीड फूट उंच होऊन मूळचा डांबरी रस्ता अरुंद झाला. या परिसरात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. गेले अनेक महिने या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी काहीशी कोंडी होत आहे. महापालिका व वाहतूक विभागाने या कांक्रिटीकरण झालेल्या परिसरात वाहनांचा वेग ताशी ठेवण्याचे फलक लावून तात्पुरती मलमपट्टी केली आहे.
स्थानिक नगरसेवक व आमदार मेधा कुलकर्णी यांना या रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, ‘‘काँक्रिटीकरण का बंद केले आहे, याबाबत मी पालिकेच्या रस्ते विभागाला व आयुक्तांना पत्रे लिहिली आहेत; मात्र त्याचे उत्तर मला मिळालेले नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व तांत्रिक बाबी तपासून हे काम सुरू झाले आहे काय, अशी विचारणा मी पत्रात केली आहे.’’
दरम्यान, अर्धवट काँक्रीट झालेल्या भागाचा हॉटेलचालक पार्किंग म्हणून वापर करीत असून रखडलेल्या कामामुळे आयती सुविधा झाल्याने सायंकाळनंतर या रस्त्यावर अरुंद बाजूने वाहतूक, दुसरीकडे उंचावर चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग, असे दृश्य दिसते.