मातृभाषेचा दुजाभाव अयोग्यच, स्वतंत्र मराठी भाषा संकुल हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:02+5:302021-01-01T04:08:02+5:30

पुणे : महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मराठी भाषेसह इतरही भाषांविषयी आदर आहे. सर्वांनीच मातृभाषेचा सन्मान राखला पाहिजे. मातृभाषेला दुजाभाव देणे ...

The disadvantage of mother tongue is inappropriate, independent Marathi language package is required | मातृभाषेचा दुजाभाव अयोग्यच, स्वतंत्र मराठी भाषा संकुल हवे

मातृभाषेचा दुजाभाव अयोग्यच, स्वतंत्र मराठी भाषा संकुल हवे

Next

पुणे : महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मराठी भाषेसह इतरही भाषांविषयी आदर आहे. सर्वांनीच मातृभाषेचा सन्मान राखला पाहिजे. मातृभाषेला दुजाभाव देणे चुकीचेच आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा देऊन राजभाषेचा सन्मान करावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद व भाषा सल्लागार समिती सदस्यांनी केली आहे.

भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये परकीय भाषा भवनाची स्थापना केली जाते. कारण भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्याला विविध भाषांचा अभ्यास करता आला पाहिजे. विद्यापीठांमध्ये स्कूल ऑफ इंडियन लँग्वेज आणि स्कूल ऑफ इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेज यांची निर्मिती योग्यच आहे. मात्र,त्यात प्रत्येक राज्यात राजभाषेला नेहमी वरचे स्थान असते. त्यामुळे विद्यापीठानेसुद्धा मराठी भाषेचा सन्मान राखत मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय घ्यायला हवा,अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे येत्या शुक्रवारी विद्यापीठाला पाठविले जाणार आहे.

---

स्वत: विद्यापीठाने राजभाषेसाठी स्वतंत्र संकुल उभे करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. गुजरातमधील विद्यापीठांमध्ये ज्याप्रमाणे गुजराती भाषेला प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्येसुद्धा स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजमध्ये मराठी विभागाचा समावेश न करता विद्यापीठाने त्यासाठी स्वतंत्र संकुल निर्माण करावे.

- अनिल गोरे, सदस्य, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन

---

पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या उद्दिष्टपूर्ततेच्या दिशेने काम करण्यासाठी मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा देणे गरजेचे आहे. मराठीइतकेच प्रेम आपण इतर भाषांवर करतोेे; पण इतर भाषांचा अधिक सन्मान करणे आणि मातृभाषेला दुजाभाव देणे योग्य नाही. विद्यापीठाने स्वतंत्र संकुलाची निर्मिती करून मराठी भाषेला सन्मान द्यावा. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे शुक्रवारी विद्यापीठाला पत्र पाठविले जाईल.

- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Web Title: The disadvantage of mother tongue is inappropriate, independent Marathi language package is required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.