शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:26 AM2018-12-19T01:26:38+5:302018-12-19T01:27:01+5:30
महादेव कोळी समाजाचा प्रश्न : अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नाही
कळंब : महाराष्ट्रातील कोळी समाजाला क्षेत्रीय बंधने उठुनही गेल्या २६ वर्षांपासून तहसील कार्यालयातून महादेव कोळी समाजाचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही. अधिकार व पात्रता असूनही केवळ शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणीक व नोकरदारांचे नुकसान होत आहे.
कोळीमहासंघ पुणे जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात कोळी समाजाच्या महादेव कोळी (एसटी) अनुसूचित जमातीच्या आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून दाखले दिले जावेत, या महत्वाच्या विषयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना देण्यात आले. सन १९७६ पासून १९९२ पर्यंत प्रत्येक तहसील कार्यालयात महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र, २६ वर्षांपासून दाखले देण्याकामी कागदपत्रे ही स्वीकारले जात नसल्याने एका पिढीचे नुकसान झाले असल्याची खंत यावेळी हजारे यांनी व्यक्त केली. यावेळी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे, युवा उपाध्यक्ष अमर धुमाळ, लता
ढगारे, बाळासाहेब डोके संजय कांबळे, संजय मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आमरण आंदोलनाचा इशारा
४शासकीय नियमाप्रमाणे ज्यांची अनुसूचित जमातीची कागदपत्रे योग्य आहेत त्यांची शहानिशा करून पुणे जिल्ह्यातील कोळी समाजाला तत्काळ जातप्रमाणपत्र देण्याची सोय करून कोळी समाजाची होत असलेली पिळवणूक थांबवावी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यथा न्यायासाठी आमरण उपोषण व धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी दिला आहे.