कोरोनाकाळात अल्पवयीन मुलीचे बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:19+5:302021-06-29T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या साडेतीन वर्षांमध्ये पुणे शहरातून तब्बल १ हजार ४०१ अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या साडेतीन वर्षांमध्ये पुणे शहरातून तब्बल १ हजार ४०१ अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्या होत्या. त्यापैकी १ हजार १८४ मुलींचा शोध घेण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मागील दीड वर्षाच्या कोरोना काळात बहुतांश काळ लॉकडाऊन असल्याने अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण काही प्रमाणात घटले आहे.
१८ वर्षांखालील मुलगा अथवा मुली बेपत्ता झाली, तर आता त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेतला जातो. गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल १ हजार ४०१ अल्पवयीन मुली घरातून निघून गेलेल्या आढळून आल्या. त्यापैकी २१७ मुलींचा अद्याप शोध लावण्यात यश आले नाही. लॉकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले असले, तरी त्याचबरोबर त्यांचा शोध लागण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाऊनमुळे शहराबाहेर जाऊन त्यांचा शोध घेण्यास अडचणी आल्या आहेत.
शोधकार्यात अडचणीच अधिक
अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने प्रेमसंबंध हे सर्वांत महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून येते. अनेकदा तिच्या पालकांना याची माहिती असते. मात्र, ते बदनामीच्या भीतीने खरी कारणे पोलिसांना सांगत नाहीत. अनेकदा पळून गेल्यानंतर मुलगी आपला मोबाईल नंबर बंद ठेवतात किंवा बदलतात, त्यामुळे त्यांचा शोध घेण्यावर मर्यादा येतात. काही प्रकरणात मुलगी पळून जाऊन लग्न करतात़ दुसऱ्या शहरात, राज्यात जाऊन राहतात. काही दिवसांनी ते पालकांना कळवितात. मात्र, पालक ही बाब पोलिसांना सांगत नाही़ त्यातून त्यांचा तपास अर्धवट राहतो.
* अपहरण झालेल्या मुलीच्या शाळा, कॉलेजमधील मित्र-मैत्रिणीकडे तपास करताना ते घाबरून माहिती देत नाहीत.
* अपहरण झालेली मुलगी काही प्रकरणात घरी आलेली असते. परंतु, पालक पोलिसांना त्याची माहिती देत नाहीत.
* संस्थेतून पळून गेलेल्या मुलींचे पूर्ण पत्ते नसतात. ते बहुतेक बाहेरील राज्यातील असतात. त्यामुळे त्यांचा शोध घेताना अडचण निर्माण होते.
* संस्थेतून पळून गेलेल्या मुली बहुदा विनापालक असतात. त्यामुळे ते पळून कोठे जातात, याबाबत शोधताना अडचणी येतात.
अल्पवयीन मुली बेपत्ता
वर्षएकूण बेपत्ताबेपत्ता मुली मिळाल्या मिळून न आलेल्या मुली
२०१८ ५३६ ४३० ४२२ ८
२०१९ ६३१ ४६३ ३८४ ७९
२०२० ४१९ ३३८ २३२ १०६
२०२१ २५१ १९७ १४६ ५५
मेअखेर
......
मुलगी घरातून का बेपत्ता झाली, याची कारणे पालकांना माहिती असतात. मात्र, आपली समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी खरी कारणे पोलिसांना सांगत नाही. त्यातून अनेकदा पोलिसांच्या तपासावर मर्यादा येतात. काही जण परराज्यात जाऊन राहतात. त्यांचा शोध घेण्यात अडचणी येतात.
- शिल्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा