सीजीएचएस व हॉस्पिटलच्या मनमानीचा जेष्ठ नागरिक रूग्ण व नातेवाईकांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 02:03 PM2019-10-23T14:03:08+5:302019-10-23T14:09:30+5:30
पुणे शहरात लाखो जेष्ठ नागरिक योजनेचे लाखाहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय लाभधारक आहेत...
पुणे : केंद्र शासनाच्या सेवानिवृत्तासांठीच्या सीजीएचएस वैद्यकीय योजनेचा रूग्णालय व सीजीएचएस कार्यालयाच्या समन्वयाच्या अभावामुळे जेष्ठ नागरिक रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. सीजीएचएसची नियमावली राबवताना रूग्णालयांकडून जेष्ठ नागरिक रूग्णांची हेळसांड सुरू आहे. पुणे शहरात लाखो जेष्ठ नागरिक योजनेचे लाखाहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय लाभधारक आहेत. मात्र सीजीएचएस दवाखान्यात देखील योग्य सोयी सुविधा व उपचार उपलब्ध नाहीत. या गंभीर समस्येमुळे जेष्ठ नागरिक व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरात सीजीएचएस योजनेचे लाखाहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय लाभधारक आहेत. नऊ दवाखान्यासह मुकुंदनगर येथील मुख्य रूग्णालयात तपासणी व उपचार दिले जातात. शहरातील काही रूग्णालयात रूग्णांसाठी उपचार,तपासणी व शस्रक्रिया हे सीजीएचएसच्या नियमावली प्रमाणे देण्यात येतात. अनेक रूग्णालयांची बीले सीजीएचएस कडून वेळेवर दिली जात नाहीत अशी रूग्णालयांची तक्रार आहे. त्यामुळे शहरातील अनेक मोठ्या रूग्णालयांनी सीजीएचएस लाभधारक जेष्ठ नागरिकांच्या उपचारासाठी त्यांचे दरवाजे बंद केले आहेत. तातडीच्या उपचारासाठीची नियमावली राबवताना सीजीएचएस कडून रूग्णालयांना काही अटी व नियम ठरवून दिले आहेत. रूग्णाची तातडीचे उपचार व त्यासाठी आवश्यक रक्कम मंजूर करण्यासाठी सीजीएचएसच्या वतीने वेगळी संस्था काम करते. त्यांच्या जाचक अटींमुळे गरजू रूग्णांना देखील कधीकधी योग्य उपचार मिळत नाहीत.
रविवारी (दि.20) रोजी एक जेष्ठ नागरिक महिला उच्च रक्तदाब व इतर त्रासांसाठी इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल येथे अॅडमीट होण्यासाठी गेल्या होत्या. हा आजार तातडीच्या उपचारात बसत नसल्यामुळे अॅडमीट करता येणार नाही असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र रूग्णाला होणारा त्रास लक्षात घेऊन नातेवाईकांनी अॅडव्हान्स पैसे भरून उपचारासाठी दाखल केले.दुसऱ्या दिवशी मतदानामुळे सीजीएचएस कार्यालयाला सुट्टी होती. बुधवारी रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्या संबंधित सीजीएचएस दवाखान्यात रितसर मेमोची मागणी केली. यावर सीजीएचएसच्या नियमांचे पालन करून रूग्णावर पुढिल उपचार करावेत असे पत्र इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलला देण्यात आले. मेमो आवश्यक असताना नियमात अॅडमीट करून घेण्याचे पत्र इनलॅक्स प्रशासनाने स्विकारले नाही.उलट उपचार सुरू असणार्या जेष्ठ नागरिक महिला रूग्णाला त्वरित डिस्चार्ज देण्यात आला.हॉस्पिटल प्रशासन व सीजीएचएसच्या समन्वयाच्या अभावामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना याचा भयंकर मनस्ताप सहन करावा लागला. नाईलास्तव नातेवाईकांनी याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांकडे याबद्दल तक्रार दिली. त्यानंतर डिस्चार्ज रद्द करून पुढील उपचार सुरू करण्यात आले. सीजीएचएस व हॉस्पिटलच्या मनमानी चा हा गंभीर प्रकार पोलिसांच्या मध्यस्थीने सुटला. मात्र रूग्णालय व सीजीएचएस यांच्या कडून याबाबत नेमकी जबाबदारी कोणाची यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. शहरातील लाखो जेष्ठ नागरिकांच्या उपचारासाठीची केंद्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा बोजवारा उडालेला आहे. मात्र त्याची कोणीही गांभीर्याने दखल घेत नाही. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सीजीएचएस लाभधारक जेष्ठ नागरिक करीत आहेत.