‘आपत्ती’जनक सुटी
By admin | Published: August 26, 2014 04:51 AM2014-08-26T04:51:48+5:302014-08-26T04:51:48+5:30
‘सुटी आहे, मदत करू शकणार नाही,’ अशी खुद्द उत्तरे आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिक व नगरसेवकांनाही दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
पुणे : ‘सुटी आहे, मदत करू शकणार नाही,’ अशी खुद्द उत्तरे आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिका-यांनी नागरिक व नगरसेवकांनाही दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुसळधार पावसानंतर सोसायट्यांत पाणी घुसले असताना जर मदत करू शकत नसतील, तर ही पथके काय कामाची, असा सवाल नगरसेवकांनी आज मुख्य सभेत केला.
पावसाळ्यात शहरात पाणी घुसण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज केली आहेत. मात्र, मुसळधार पाऊस होऊन सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. त्याच दिवशी सुटी असल्याने या सर्व कामाचा भार अग्निशमन विभागावर आला.
महापालिकेने शहरात ज्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत पावसाचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी २४ तास मदतकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके, मदतीसाठी आवश्यक साधन सामग्री सज्ज केली होती.
शहरात शनिवार व रविवारी जोरदार पाऊस झाला. त्यातच महापालिकेस प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी,
तसेच रविवारी सुटी असते. त्याचे कारण पुढे करीत या क्षेत्रीय कार्यालयांनी चक्क मदतीसच नकार दिल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)