जिल्हा प्रशासनासाठी आपत्तीचे वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:25+5:302020-12-31T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा प्रशासनासाठी सन २०२० हे संपूर्ण वर्षच आपत्तीचे ठरले. जगासह देशाला महामारीच्या संकटात टाकणारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा प्रशासनासाठी सन २०२० हे संपूर्ण वर्षच आपत्तीचे ठरले. जगासह देशाला महामारीच्या संकटात टाकणारा महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात पुण्यात सापडला. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पुण्यात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक गाठला व देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद झाली ती आजही कायम आहे.
कोरोनाच्या उपाय-योजनामध्ये प्रशासन व्यस्त असताना जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चक्रीवादळ येऊन थडकले आणि शेकडो लोकांचे घरसंसार, शेतीवाडी उध्वस्त करून गेले. कोरोना, चक्रीवादळाचे संकट कमी की काय ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. या सर्व संकटांना प्रशासनाला तोंड द्यावे लागले.
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली की सर्व जबाबदारी महसूल विभागावर येते. आतापर्यंत आलेल्या हजारो संकटाना समर्थपणे थोड देखील दिले आहे. परंतु सन २०२० या वर्षात संकटे पाठ सोडायचे नावच घेऊना अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडल्यानंतर काही दिवस प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला. जगात कोरोनाचा उद्रेक होत असला तरी आपल्याकडे पहिला रुग्ण सापडल्यानंतर ठोस उपाय योजना करण्याऐवजी चाचपणीच करत राहिले.
पहिला रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी एटक उपाय योजना केल्या असत्या तर कदाचित परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रण राहिली असती. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ३ लाख ६१ हजार ५९६ लोकांना कोरोनाची लागण झाली व ८ हजार ७९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.
कोरोना महामारीच्या उपाय-योजनामध्ये संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असताना जुनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चक्रीवादळ व मुसळधार पाऊसाने प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी आणि भोर, वेल्हा या पावसाच्या तालुक्यांना झोडपून काढले. यात हजारो लोकांचे घरसंसार वादळ-वा-यात वाहून गेले. काही जिवंत हानी सोबत शेकडो जनावरे मरण पावली, तर तब्बल २९ हजार ७७९ शेतकऱ्यांचे ७७ कोटींचे नुकसान झाले.
ऑक्टोबर महिन्यांत चक्रीवादळाच्या संकटातून वाचलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक धुवाधार पाऊस बरसला आणि सुमारे १८ लोकांसह अनेक जनावरे, घरे या अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ८१८ शेतकऱ्यांचे सुमारे ९५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या एकापाठोपाठ आलेल्या संकटांमुळे ‘हुश्श संपले एकदाचे हे वर्ष’ अशीच भावना प्रशासनाने व्यक्त केली तर आश्चर्य वाटायला नको.