'एनडीए' चा १३९ वा शिस्तबद्ध दिमाखदार दीक्षांत सोहळा; सारंग, सुखोई ठरले आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 07:48 PM2020-11-07T19:48:57+5:302020-11-07T19:55:06+5:30
सुखोई ३० विमानांनी फ्लायपास करत दिली विद्यार्थ्यांना मानवंदना
पुणे : तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाया आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३९ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा शनिवारी कडाक्याच्या थंडीत खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिचा १३९ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा कोरोनामुळे यंदा हा सोहळा मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्राच्या तसेच राज्याच्या कोविड नियमावलीमुळे यंदा पालकच्या अनुपस्थितीत हा सोहळा पार पडला.
भारतीय हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश सिंग भदौरिया या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे होते. त्यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. या वेळी एनडीएचे कमांडंट लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री आदी उपस्थितीत होते.
संचलन सोहळ्यात एकुण ५४० छात्र सहभागी झाले होते. यातील ३०२ छात्र हे १३९ तुकडीचे होते. यातील २२२ छात्र हे लष्कराचे, ४२ छात्र नौदलाचे आणि ३५छात्र हे हवाईदलातील होते. याशिवाय १७ मित्रदेशांच्या छात्रेही सोहळ्यात सहभागी झाले होते. सुखोई ३० विमानांनी फ्लायपास करत यावेळी विद्यार्थ्यांना मानवंदना दिली. तर सारंग या हेलिकॉप्टरने चित्तथरारक हवाई कवायती सादर केल्या.
......
बटालियन कॅडेट कॅप्टन अनिरुद्ध सिंगने गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत प्रथम येत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक जिंकले. विभागीय कॅडेट कॅप्टन सोमय बडोलाने गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत दुसरे स्थान मिळवत राष्ट्रपतींचे रौप्य पदक पटकावले. तर बटालियन कॅडेट कॅप्टन अनमोलने एकूण क्रमवारीत गुणवत्तेच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर येत राष्ट्रपतींचे कांस्यपदक जिंकले. संचलनादरम्यान सादर केलेला चॅम्पियन स्क्वॉड्रन म्हणून ‘इंडिया’ स्क्वॉड्रनने प्रतिष्ठित ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ मिळविला.