इंदापूरात शरद पवार गटात नाराजी; 'मविआ' च्या मानेंची बंडखोरी कायम; तिरंगी लढतीत घड्याळाला महत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:56 PM2024-11-04T16:56:57+5:302024-11-04T16:57:52+5:30
इंदापूरात शरद पवार गटातील प्रवीण मानेंची नाराजी अपक्ष लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने या तिघांमध्ये तिरंगी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे.
इंदापूरात तात्काळ प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून उमदेवार देण्यात आली. त्यामुळे शरद पवार गटाचे नेते प्रवीण माने यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांची मनधरणी करण्यासाठी शरद पवार यांनी कालच त्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची नाराजी दूर झाली नाही. आज अखेर त्यांनी बंडखोरी कायम ठेवून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. आता इंदापूरात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र इंदापूरातील नागरिक पक्ष बदललेल्या नेत्याला कि नाराज होऊन अपक्ष लढणाऱ्याला साथ देणार. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. किंवा महाविकास आघाडीच्या बंडखोरीचा फायदा महायुतीला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
छाननीमध्ये ६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ३४ उमेदवारांचे अर्ज राहिले होते. त्यापैकी १० उमेदवारांनी माघार घेतली. निवडणूक रिंगणात असणा-या उमेदवारांची नावे अशी : हर्षवर्धन शहाजीराव पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), आ.दत्तात्रय विठोबा भरणे ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष),श्रीपती महादेव चव्हाण ( बहुजन समाज पक्ष),अमोल शिवाजी देवकाते (मनसे),ॲड.गिरीश मदन पाटील,(महाराष्ट्र विकास आघाडी),हनुमंत कोंडीबा मल्लाव (भुई),आकाश भाऊ पवार,तानाजी उत्तम शिंगाडे ( रासप), प्रवीण दशरथ माने (अपक्ष),अमोल आण्णा आटोळे, हर्षवर्धन गोपाळराव पाटील,अमोल अनिल रांधवण,अनुप अशोक आटोळे,अनिरुध्द राजेंद्र मदने, ॲड.पांडुरंग संभाजी रायते,सुधीर अर्जुन पोळ,विकास भिमराव गायकवाड,जावेद बशीर शेख,भगवान बापू खारतोडे, ॲड.संजय बापू चंदनशिवे,किसन नारायण सांगवे,दत्तात्रय सोनबा भरणे, संभाजी मधुकर चव्हाण,भिमराव जगन्नाथ शिंदे